Tuesday, August 17, 2010

भीमाशंकर व्हाया शिडी घाट !!

१५-१६ ऑगस्टला (2009) काय करायचे ठरवता ठरवाता ऑर्कुटवरील "Trek Mates" या ग्रुपबरोबर भीमाशंकरला जायचे ठरवले.. ह्या ग्रुपमध्ये कुणालाही आधी भेटलो नव्हतो पण गेले एक वर्ष त्यांचे ट्रेकींग ईवेन्टस मात्र वाचत होतो.. त्यांच्याबरोबर जायचे म्हणजे घरातले काळजी करतील म्हणुन एका मित्राला(त्याचा पहिला वहिला ट्रेक !!) घेउन जायचे ठरवले... पहिलाच ट्रेक त्याचा म्हणुन मी त्याला "शिडी घाटचा थरार नि नेहमीची तंगडतोड याबाबत" जाणीव करुन दिली पण त्यानेही उत्साहाने भीमाशंकर पार करण्यास मी फिट आहे सांगितले..
भीमाशंकर व्हाया शिडी घाट म्हणजे एक थरारक अनुभव असे फार ऐकुन होतो.. त्यामुळे उत्साह दांडगा होता.. त्यातच निसर्गाच्या किमयाने तयार झालेले गुप्त भीमाशंकर (धबधब्याच्या पडणार्‍या पाण्याने तयार झालेले शिवलिंग) ऐकुन होतो.. तेदेखील पहायचे होते.. म्हटले पाउसचाही जोर नाहिये.. त्यामुळे जाण्यास हरकत नाही असे ठरवले..
ट्रेक लिडरने सांगितल्याप्रमाणे १५ ऑगस्टला पहाटे ५.५० ची दादरहुन कर्जत लोकल पकडुन ८ च्या सुमारास कर्जत गाठले.. तिकडेच सगळ्यांची भेट झाली.. पुण्याहून देखील ६-७ जण हजर झाले.. नि आमची एकुन संख्या ३२ झाली.. चायपानाचा कार्यक्रम उरकुन होतो तोच आधीच बुक केलेल्या तीन "टमटम (6 seater)" हजर झाल्या.. एका टमटममध्ये ११- ११ जण बसुन आम्ही टमटमची क्षमता सिद्ध केली.. फिदीफिदी" alt="फिदीफिदी" class="smiley-content"> तिकडुनच आम्ही खांडस गावाकडे (साधारण ३४ किमी) प्रयाण केले..
पाउण एक तासाने खांडस गावात पोहोचताच गाईड्स लोकांनी विचारपुस सुरु केली.. त्यांना डावलुन आम्ही त्या गावातुन भीमाशंकरची वाट धरली.. साधारण दिड दोन किमीनंतर एक पुल लागला.. पुल संपताच समोर फलक दिसला.. शिडी घाट डावीकडे नि गणेश घाट उजवीकडे.. शिडी घाटाने(अवघड वाट) जाण्यास अंदाजे तीन तास नि गणेश घाटाने(सोप्पी वाट) जाण्यास अंदाजे ६ तास लागतात असे ऐकुन होतो.. आम्ही परतीची वाट गणेश घाटाने करायची ठरले होते.. त्याच थांब्यावर सगळ्यांची ओळख परेड झाली.. नेहमीच्या ओळख परेड पेक्षा वेगळी होती कारण इथे तुम्ही काय करतात यापेक्षा तुम्ही किती ट्रेक्स केलेत यात सगळ्यांना उत्सुकता जास्त होती.. नि नवल म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्ती पहिल्यांदाच ट्रेक करत होते !
१५ ऑगस्टचे निमित्त साधुन राष्ट्रगीत म्हटले गेले.. घोषणांची आतषबाजी करत आम्ही पुढे वाटचाल केली.. नि पावसाची रिपरिप देखील सुरु झाली.. "सगळीकडे हिरवेगार नि समोर ढगांमध्ये लपलेली भीमाशंकरची डोंगररांग" एकदम मस्त वाटत होते..
lets go.jpg
लाल मातीची ओली पाउलवाट तुडवत आम्ही जंगल प्रदेशाकडे वाटचाल करु लागलो.. वाटेत पाण्याचा एक ओहोळ लागला नि तिथेच काही काळ विश्रांती घेतली.. एव्हाना पावसाळी ढगांनी आकाशात दाटी केली होती.. जंगल सुरु होताच घनदाट झाडी लागली नि कातरवेळेस प्रारंभ झाला की काय वाटु लागले.. ती घनदाट झाडी बघुन इकडे एकट्या दुकट्याने येणे फक्त अशक्य असल्याची खात्री झाली.. गाईड हवाच ! आमचे ट्रेक लिडरही एक-दोन वाटेवर गोंधळले कारण पावसामुळे अस्ताव्यस्त विखुरलेले छोटेमोठे दगडधोंडे नि सगळीकडे वाढलेली झुडुपे.. यामुळे मूळ वाट ओळखणे जरा कठीणच गेले..
एक तास गेला तरी शिडीचा काही पत्ता लागत नव्हता.. आता येइल म्हणता म्हणता काहि मिनीटातच जंगल मागे सरले नि डोक्यावरील झाडांचे छप्पर गायब झाले.. पुढे जायची वाट पण बंद झाली कारण समोरच उंचसा कातळकडा उभा राहिला.. एव्हाना आम्ही देखील बरीच उंची गाठली होती ते मागे वळुन पाहताच लक्षात आले.. आता पुढची वाटचाल त्या डोंगराला वळसा घालुन करायची होती.. जिथे शक्य नाही तिथे लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत..
पहिलीच शिडी डाव्या बाजुला दिसली जी एका मोठ्या खडकावरुन दुसर्‍या खडकावर जात होती.. मध्ये १०-१५ फुटाची दरी नि पुढे तिला लागुनच अजुन खोल दरी होती.. (किती खोल ते नीटसे आठवत नाहीये) पुढे ती शिडी जरी चढुन गेलात तरी क्षणाची उसंत नव्हती.. तिथेच खडकाला धरुन उभे रहायचे होते नि दोनवितभर असणार्‍या वाटेतुन पुढे सरकायचे होते.. याची कल्पना या फोटोवरुन येईलच..
1st ladder.jpg
हा थरार कमी म्हणुन की काय पावसाने जोरदार आगमन केले !! या शिडीतुन एकावेळी एकच जण हळुहळु जात होता.. आधीच शिडी घाटातील हा कठीण टप्पा त्यात पावसानेही जोर धरला.. त्यामुळे सगळ्यांना सांभाळताना, सुचना करताना लिडर्सलोकांना बरीच कसरत करावी लागली.. खरी गंमत पुढे होती.. जिथे अक्षरक्षः स्पायडरमॅनसारखे मोठ्या पाषाणाला चिकटुन जायचे होते.. कारण पुढे चार्-पाच फुट अंतराची वाटच नव्हती.. तिथे फक्त पाषाणाला असलेल्या खाचांमध्ये हात घालुन नि लिडरने दाखिवल्याप्रमाणे मोक्याच्या जागी पाय ठेवुन ती वाट पार करायची होती.. हा माझा प्रयत्न
2nd ladder.jpg
अंतर तसे फारच कमी होते पण पावसाने तो थरार रोमांचक बनवला.. हा पॅच सर करताच दुसर्‍या शिडीने अजून वरती जायचे होते.. नि गंमत म्हणजे ह्या शिडीच्या टोकाला असणार्‍या झाडाच्या मुळाचा आधार घेउन चढायचे होते !! मी लगेच ती शिडी पार केली नि झाडाजवळुनच खालचा फोटु काढला.. तेव्हा अंदाज आला वाट तेवढी सोप्पी नव्हती..
jhaad.jpg
फोटो घेत असतानाच एक दुर्घटना घडली.. काहि क्षण थांबलेला पाउस पुन्हा जोरात सुरु झाला.. नि अचानक वरतुन उंचावरुन बर्‍यापैकी मोठा दगड खाली पडला.. सुदैवाने तो खाली पहिल्या शिडीनजीक उभे असलेल्या दोघांच्या बरोबर मध्ये पडला !! सगळेजण तात्काळ सावध झाले..
दुसरी शिडी पार केल्यानंतर मी तिसर्‍या शिडीकडे सरसावलो.. पावसामुळे वरतून घरंगळत येणारे पाणी.. नि निसरडी वाट.. त्यामुळे आम्ही आता सगळे जवळपास घोडागाडी करुनच जात होतो.. तिसरी शिडी मात्र खुपच सोप्पी वाटली.. पटकन चढुन गेलो नि मग पुढे जिथुन पाण्याचा छोटेखानी झरा येत होता त्याच वाटेने आणखी वर चढलो.. खुपच मजा येत होती.. कपडे भिजतील, चिखलाने माखतील इकडे लक्षच नव्हते.. बस फक्त आपल्या हातापायांची पकड बरोबर आहे ना याचा अंदाज घेत पुढे जात होतो.. त्या झर्‍याची वाटेने वरती आल्यावर उजवीकडे गुहा लागली.. तिथेच काहि काळ थांबुन विश्रांती घेतली.. गुहेसमोरच वरतुन उंचावरुन पडणारे पाणी अंगावर झेलण्याची मजा काही औरच होती.. आमच्या ग्रुपपैकी आम्ही ८-९ जणच पुढे आलो होतो.. बाकीचे अजुन पहिली नि दुसरी शिडीच पार करत होते.. एकंदर आमची तीन ग्रुपमध्ये फाळणी झाली होती.. पुढे असणारा आमचा घोळका.. मध्यम गतीचा मधला घोळका.. नि शेवटी राहिलेला संथ गतीचा घोळका (ज्यात दोन व्यक्ती "वजनदार" होत्या) फिदीफिदी" alt="फिदीफिदी" class="smiley-content">..
वाटले तिन्ही शिड्या पार झाल्या.. बरेचसे चढुन आलो.. आता कष्ट कमी लागतील.. पण छे ! पुढे अजुन एक ६-७ फुटाचा रॉक पॅच लागतो.. तो तसाच चढावा लागतो.. लिडरने ज्यांना अशक्य होते त्यांच्या मदतीसाठी दोरखंड ठेवला होता..
तो चढुन गेल्यावर लक्षात आले.. आतासा कुठे एक डोंगर पार करुन विस्तीर्ण पठारावर आलोय !! इथुनच समोरील डोंगररांगामधील पदरगडाचे विलोभनीय दर्शन झाले.. पुढे जाताच भलीमोठी भातशेतीही नजरेस आली..! हा हिरवा पट्टा बघितला नि कोकणची आठवण आली ! त्याच शेतीतुन वाट काढत पुढे विश्रांतीसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये आलो नि जेवणाचे डबे उघडले.. याचठिकाणी शिडी घाटचा रस्ता नि गणेश घाटचा रस्ता एकत्र येतो..
तासभरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा जंगलातुन जाणार्‍या वाटेस लागलो.. अजुन दीडएक तासाचा अवधी लागेल असे लिडरने सांगितले.. पण आता वाट सरळ चढणीची होत होती.. वाट कसली.. नुसती खडकाळ.. मध्येच खड्डे मध्येच उंचवटे.. तर मध्येच लाल मातीची घसरट वाट.. पायांच्या स्नायुंना चांगलाच व्यायाम मिळत होता.. स्मित" alt="स्मित" class="smiley-content"> अधुन मधून पावसाच्या सरी हजेरी लावत होत्या.. पण आमचा घाम मात्र निघतच होता.. पुन्हा एकत्र आलेले सगळे आपाआपल्या कुवतीनुसार मागे पुढे विखुरले गेले.. फिदीफिदी" alt="फिदीफिदी" class="smiley-content"> काही मिनीटातच वाट डोंगराच्या कडेने जाउ लागली.. नि समोरील निसर्गदृश्य पाहुन विलक्षण गारवा वाटला.. प्रत्येक ठिकाणी थांबुन बघत रहावे असा नजारा होता.. इतकी उंची गाठली तरी अजुन बराच डोंगर सर करायचा होता.. अर्ध्याएक तासातच पुन्हा वाट जंगलात शिरली.. पावसाळी वातावरण, गर्द झाडी , धुके यांमुळे बरेचसे अंधारुन आले होते.. भुतपटात दाखवतात तसेच वातावरण होते.. माकडांचे घुमणारे "हूप हूप" आवाज नि कुठल्या तरी पक्ष्यांची सुमधुर शीळ याने मात्र तेथील शांतता भंग होत होती..

काही अवधीतच गर्द झाडीच्या जंगलातुन बाहेर पडलो नि चढण लागले.. शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो होतो पण त्याचबरोबर चालही आमची मंदावली होती.. हवेतील गारवा तर विलक्षण वाढला होता.. मागे पाहीले तर गोगलगाय गतीने येणार्‍या मंडळींचा मागमुसही नव्हता.. पण प्रत्येक घोळक्याबरोबर एकेक ट्रेक लिडर राहत असल्याने चिंता नव्हती.. काही मिनीटातच आम्ही वरती पोहोचलो.. तिथे धुक्यामुळे फारच अंधुकसे दिसत होते.. बोचरी हवा अंगावर शहारे आणत होती.. अशा धुंद वातावरणात आम्ही लागलीच धरतीला पाठ टेकवली.. काहीजण आपले पाय किती सोलले गेलेत ते बघत होता (त्यात माझा मित्रही होता.. त्याची १७ ऑगस्टची देखील सुट्टी अनधिकृतपणे तेव्हाच तह झाली फिदीफिदी" alt="फिदीफिदी" class="smiley-content">)
इथेच काही फुट अंतरावर तळे आहे.. पण दाट धुक्यामुळे (की ढगामुळे ?) तेदेखील अदृश्य झाले होते.. अर्ध्यातासातच बाकीचे पोहोचले नि एकच जल्लोष केला गेला.. सामुहीक घोळका नृत्य झाले.. डिस्को इफेक्ट यावा म्हणुन दोघा तिघांनी टॉर्च सुरु करुन झिकझ्यॅक लाईट मारु लागले.. हा जल्लोष इतक्या जोशमध्ये झाला की सगळयांचा थकवा पळुन गेला.. थंडीने आखडलेले सगळे एकदम फ्रेश झाले.. सगळेजण एकमेकांमध्ये मिसळुन गेले होते.. काही क्षणातच अंधार पडला नि मग आम्ही टॉर्च घेउन तळ्याच्या बाजुने जाणार्‍या वाटेने पुढे निघालो..
१५ मिनीटाच्या अंतरातच भीमाशंकर मंदीराच्या हद्दीत पोहोचलो.. इथेही सर्वत्र धुकेच (की ढग ? ) पसरले होते.. त्या मंदीराच्या आवारातच असलेल्या एका धर्मशाळेत आसरा घेतला.. लिडरलोकांनी आधीच बुक करुन ठेवल्याने प्रश्ण नव्हता.. पण प्रश्ण होता गुप्त भीमाशंकर नि नागफणी (भीमाशंकर डोंगरावरील सर्वोच्च टोक) कधी करायचे.. दोन्ही कडे जाण्याची वाट घनदाट जंगलातली असल्याने रात्रीची करणे फारच धोक्याचे होते.. त्यामूळे वेळेअभावी एकच काहितरी करण्याजोगे होते.. माझ्याबरोबर अनेकांनी गुप्त भीमाशंकरच्याच पर्यायाला उचलुन धरले.. नि सकाळी जायचे ठरले..
त्याच रात्री आठ्साडेआठच्या सुमारास आम्ही भीमाशंकरचे दर्शन घेतले.. गर्दी नसल्याने अगदी निवांतपणे दर्शन झाले.. चक्क गाभार्‍यात प्रवेश मिळाला.. तेदेखील शिवलिंगाजवळ जवळपास १० मिनिटे तरी बसायला मिळाले.. कोण्याएकाने हटकले नाही.. एवढे कष्ट घेउन आलो म्हणुन की काय चांगलेच फळ मिळाले होते स्मित" alt="स्मित" class="smiley-content"> याच मंदिरासमोर चिमाजीअप्पांनी आणलेली विशाल घंटा आहे.. मंदीराच्या आवारातच दोन तीन छोटी मंदीरे नि प्राचिन दिपमाळ आहे.. तर मंदीराच्या एका बाजुला राम मंदीर आहे..
या मंदीराच्या बाजुनेच उतरणीची वाट गुप्त भीमाशंकराकडे नेते..
आम्ही सकाळीच निघालो त्यामुळे आल्हाददायक वातावरण होते.. ही वाट सुद्धा घनदाट जंगलातुन आहे.. येथुन जाताना आम्ही कुठे "शेकरु" (पंख असलेली मोठी खार.. अतिशय लाजाळु नि दिसण्यास अत्यंत दुर्मिळ असा हा जीव भीमाशंकरच्या जंगलात आढळतो) दिसतेय का म्हणुन शांततेत जात होतो.. पण आमच्या नशिबात शेकरुदर्शनाचा योग नव्हता.. अरेरे" alt="अरेरे" class="smiley-content"> तेवढे कुठे आम्ही नशिबवान..
दोन ओहोळ पार केल्यानंतर वीसएक मिनीटात धबधब्याचा मोठा आवाज कानी पडला.. नि गुप्त भीमाशंकराचे ठिकाण आल्याची चाहुल लागली.. क्षणात डावीकडे धबधबा नजरेस पडला.. आम्ही लगेच ज्या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडते त्या दिशेने उतरु लागलो.. जिथे पाणी पडते तिथेच एका बाजुला हे छोटे गुप्त भीमाशंकर नजरेस पडले.. त्याच्यावरतुन पाणी जात असल्याने एकाला बाजुला झोपवुन पाणी अडवण्यास सांगितले.. स्मित" alt="स्मित" class="smiley-content">
gupt.jpg
दर्शन घेउन सगळ्यांनी पाण्यात डुबक्या मारुन घेतल्या.. नि नाश्त्यासाठी परतीची वाट धरली..
साधारणत: ११ च्या सुमारास आम्ही गणेश घाटाने परतण्यास सुरवात केली.. शिडी घाटाने वर आल्यावर आता ह्या वाटेत काहीच दम वाटला नाही.. वाट जरी सरळ असली तरी अंतर बरेच असल्याने दमछाक करणारी मात्र आहे.. या घाटातच गणेश मंदिर लागते.. बाप्पांचे दर्शन घेउन अर्ध्या तासातच आम्ही पुर्णतः डोंगर खाली उतरलो नि ज्या पुलाजवळुन सुरवात केली होती तिथे साडेचारच्या सुमारास पोहोचलो ! परतानादेखील गोगलगाय गतीने येणार्‍यांनी अपेक्षेप्रमाणे पोहोचण्यास अजुन एक तास घेतलाच.. तोवर आम्ही गरम भजी नि चहाचा आस्वाद घेतला..
१५-१६ ऑगस्टची सुट्टीचा चांगलाच फायदा झाला.. ग्रुपही चांगला मिळाला.. नविन मित्र मिळाले.. लिडरलोक्सही अगदी मित्रत्वाने सगळे सांभाळुन घेत होते.. मी तर ठरवले पुन्हा भीमाशंकरला जायचे झाले तर शिडी घाटानेच ! नि पावसातच !! ज्यांचा पहिला ट्रेक होता त्यांना तर अभिमान वाटत होता चक्क शिडी घाटाने भीमाशंकर गाठले !! तो थरार काही वेगळाच ! वजनदार लोकांनीदेखील ठेचकाळे खात, वेदना सहन करत ट्रेक यशस्वीरित्या पार केला ते कौतुक वेगळेच होते !
शेवटी आवड, मानसिक संतुलन नि जिद्द महत्त्वाची.. (नि हो तितकीच अंगात मस्ती देखील हवी) !! फिदीफिदी" alt="फिदीफिदी" class="smiley-content">

Sunday, July 4, 2010

"लख लख चंदेरी"

शनि-रविवारी "राजगड" चा मस्त ट्रेक झाला होता.. हँगओवर उतरला नव्हता.. त्यातच माझा नेहमीचा ग्रुप "ट्रेकमेटस" चा समस आला की 'येत्या रविवारी चंदेरी ट्रेक.. !'.. झाल्लं म्हटले आता बॅक टू बॅक ट्रेक होणार तर.. पण ठरवले जर शुक्रवारपर्यंत पाउस पडला तरच जायचे !
पावसाने मुंबईत भलतीच विश्रांती घेतली होती त्यामुळे शेवटी चंदेरी नको असे वाटु लागले.. कारण पावसाशिवाय चंदेरीला जाणे म्हणजे वेडेपणाच ! पाउस नाही तर चंदेरी ट्रेकला सर नाही.. तेव्हा "नाही" चा विचार चालु असतानाच शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार पुनरागमन केले.. शनिवारीदेखील चालूच राहिला.. मग काय.. लगेच फोन करुन नाव नोंदवले !

चंदेरी हा गड म्हणुन गणला जातो पण फारसा इतिहास कुठेच आढळत नाही.. त्या काळातील लष्करी चौक असावी असे म्हटले जाते.. तरीदेखील चंदेरी हा ट्रेकर्समंडळीमध्ये प्रसिद्ध आहे.. पण पावसातच काय ती मजा !! कारण मार्गात लागणारे अनेक धबधबे ! पाण्यातून जाणारा मार्ग ! तेव्हा मौजाही मौजा ! फिदीफिदी

चंदेरी ट्रेक हा तसा मध्यम-कठीण श्रेणीचा मानला जातो.. चढताना लागणारी निसरडी वाट नि पाण्यातुन असणारा चढ म्हणुन हा ट्रेक मध्यम ते कठीण श्रेणीत येतो.. या गडावर जाणे म्हणजे तिथे असलेल्या सुळक्यापाशी पोहोचणे ! त्यामुळे साहाजिकच मी फार उत्सुक झालो होतो.. म्हटले फार कमीजण येतील.. पण संख्या कानावर आली १०० !!! च्यामारी जत्रा !!!!

ह्या चंदेरीवर जाण्यासाठी ट्रेकर्समंडळी मुंबई-कर्जत रेल्वेमार्गावर असणार्‍या 'वांगणी' रेल्वेस्थानकावर उतरुन तिकडची वाट (वांगणी- गोरेगाव- पायथ्याचे गावःचिंचोली) पकडतात.. पण आमचे उलटे होते.. पनवेलवरुन जायचे ठरले होते.. ह्या वाटेचा कोणी फारसा वापर करत नाही.. तशी माहितीसुद्धा फार कुठे मिळाली नाही.. त्यामुळे वाट कशी असणार याबद्दल औत्सुक्त्य होते..

पनवेल एस्टी स्टँडला सकाळी ६.५० वाजता पोहोचायचे म्हणजे मोठे आव्हान होते.. पण नंतर कळले दहिसर-गोरेगावातुन पण ५-६ जण येताहेत तेव्हा थोडे हायसे वाटले.. सकाळी ५ ची एस्टी पकडुन रवाना झालो.. थोडे टेन्शन होते मला.. वाटेचे नाही तर येणार्‍यांचा एकुण आकडा बघून ! त्यातच ही वाट कठीण !! पनवेलला पोहोचलो नि आमचे "एओ" "एओ" चे साद-प्रतिसाद चालु झाले.. क्षणातच ठाण्या-कळव्यावरुन येणारी मंडळीदेखील हजर झाली.. मग काय स्टॅंडवर फक्त ट्रेकमेटसवाले नि ट्रेकमेटसवालेच ! पावसाची रिपरिप चालूच होती.. हजेरी झाली.. आदल्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे २० जण कटाप झाले नि संख्या ८० वर स्थिरावली.. ! हुश्श.. ! हेही नसे थोडके !

पण तिकडे पोहोचताच जुने -पुराणे ट्रेक मेटस भेटले.. नि ट्रेकच्याच गप्पाटप्पा सुरु झाल्या.. तिकडुन लवकरच आम्ही स्टँड खाली केले.. (फिदीफिदी) नि जवळच एका रोडजवळ टमटमची वाट पाहू लागलो.. पाचेक मिनीटातच ४-५ टमटम येउन धडकल्या नि आम्ही ताम्हसई गावाकडे(पायथ्याचे गाव) कूच केले..

अर्ध्यापाउणतासातच आम्ही त्या छोट्या गावात येउन पोहोचलो.. त्या गावातील लोकसंख्या आमच्या ग्रुपपेक्षा कमी असावी कदाचित !! तेथील शाळेच्या आवारत आम्ही वर्तुळ केले नि धमाल ओळखपरेड सुरु झाली..

नाश्त्याचेदेखील वाटप त्याचवेळी झाले.. यावेळेसही बरेच जण पहिल्यांदा ट्रेक करत होते.. (च्यामारी.. ) आमच्या ग्रुपमध्ये फक्त दोघेचजण या वाटेने गेले होते नि तेच आम्हाला लिड करणार होते..

चहापाणी आटपली नि आम्ही तासभरातच ट्रेक सुरु केला.. वाटेची सुरवातच पाण्यात पाय टाकुन होणार होती.. ! लै थंडगार !!!

------------------------

शाळेतल्या मुलांप्रमाणे सगळे एकेक करुन बांधवरुन जाउ लागले.. आमच्यातले काही पठ्ठे तर आताच डुबक्या घेत मजा करु लागले.. ! तिकडुनच पुढे पुन्हा एक छोटेखानी ओढा आडवा आला.. तो पार करुन पसरलेल्या हिरवळीतून जाउ लागलो..

समोर डोंगर ढ्गाआड हे सांगायला नकोच ! चंदेरी नक्की कुठला ते कळत नव्हते !..
थोडाफार चढ लागला नि ८० च्या ग्रुपचे १० -१० जणांत तुकडे पडले !! फिदीफिदी

अर्ध्यातासातच गर्द झाडीतुन दोन विंहगमय धबधब्याचे दर्शन झाले.. !

ते बघताच सगळ्यांची पावले झपाझप पडु लागली.. तसतसा पाण्याचा खळखळाट येवु लागला.. पाचेकमिनीटातच वाट चक्क वाहत्या पाण्यात उतरली.. ! सह्ही !!
पाणी फारसे नव्हते.. पण गुडघ्याभर होते.. पाण्याचा प्रवाह जोरदार होता.. नि अर्थातच शेवाळ धारण केलेले खडकदेखील आम्हाला पाडायला, अडथळा आणायला तयार होते.. ! पण असले ठि़काण लागल्यावर कोण घाबरतय.. नुसती दे धमाल सुरू..

----------------------

---------------------

--------------------

प्रत्येक ग्रुपमध्ये फोटोसेशन जोरदार सुरु होते.. कल्लोळ सुरु झाला.. कोण एक दुसर्‍याला मदत करत होता.. कोण स्वत:चा फोटो काढुन घेत होता.. कोणी पाण्यात डुबक्या मारुन घेत होते.. तर कोणी चलो आगे बढो.. पुढे चला म्हणत ग्रुपला पुढे ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.. फिदीफिदी

मला तर ते डोळ्यासमोर कोसळणारे मोठे धबधबे खासच वाटले.. होतेच तसे.. सभोवर हिरवाईमध्ये लक्षवेधी ठरत होते..

-----------------------

----------------------

---------------------

------------------

क्षणभर वाटले ही वाट तिकडेच जाते की काय.. फारसे लांब नव्हते.. नि झालेही तसेच.. आम्ही त्याच दिशेने खेचले गेलो.. पण वेळीच एकाच्या लक्षात आले की पुढे गेलेले अर्धेजण डावीकडे जंगलात घुसलेत.. नि आम्ही दिशा बदलली.. मागे वळुन पाहिले तर अर्ध्यापेक्षा पब्लिक मागेच होता.. यथेच्छ मौजमस्ती सुरु झाली होती.. तर आमच्या पुढची मंडळी तर एव्हाना जंगलात गायब झाली होती..

जंगल सुरु झाले नि वाटेत झाडाझुडूपांचा अंधार आला.. बर्‍यापैंकी निसरडी, चिखलमातीची चढ असणारी वाट (सरळ चढ आहे) चढुन गेलो नि गर्दझाडीच्या जाळ्यातून बाहेर आलो.. बघतो तर उजवीकडे तेच दोन धबधबे नजरेखाली.. लै क्लास !

--------------------------------------------
इथुनच या धबधब्याच्या पाण्याचे पात्र दिसुन आले.. इथुनच आम्ही वाट तुडवत आलो होतो..

--------------------
बाजुच्याच ङोंगराच्या काळ्या खडकावर पांढर्‍या रेघांचे चलचित्र उमटले होते..

तेच धबधबे उजवीकडे ठेवत आम्ही पुढची वाट पकडली.. पुन्हा तशीच चिखलवाट.. चढण पार करुन पुन्हा उतार.. नि इथे इटुकला असा धबधबा.. पण पाण्याचा प्रवाह लै स्पीडमध्ये !

------------------

------------------

पुन्हा काहिजणांनी इकडे ब्रेक घेतला..मी तिथे न थांबताच पुढे गेलो.. पुन्हा वाट जंगलात शिरली.. दोन्ही बाजुला खांद्याला लागणारे जंगल नि त्यातुन चढणाच्या असलेल्या वाटेने जाउ लागलो.. हा टप्पा तर खुपच दमछाक करणारा आहे.. पुन्हा एकदा गर्दझाडीचे छप्पर लागले नि उजेड कमी झाला.. वातावरण जरी पावसाळी असले तरी पाउस केव्हाच थांबला होता.. पण वाट चिखलात मळलेली.. त्यात ओले मोजे नि भिजलेले बुट... वाराही नव्हता..साहाजिकच घामाच्या धारा वाहु लागल्या.. या टप्प्यात माझ्या आसपास कोणीच नव्हते.. ग्रुपमधल्या दोन तीन तुकड्या पुढे गेल्या होत्या तर मागेच अर्ध्यापेक्षा जास्त पब्लिक राहिला होता.. म्हटले हे लोक्स चढुन वरती येणार कधी ?? ही कंटाळवाणी वाट कधी संपतेय असे झाले होते.. थांबायचे म्ह्टले तर मच्छर तयार भुणभुणायला.. लवकरच पुढे गेलेल्या एका तुकडीला जाउन मिळालो.. ह्या तुकडीत बरेच नवखे असल्याने ते खुपच त्रस्त झाले होते.. कधी येणार चंदेरी म्हणत चढत होते..

अर्ध्यातासातच वाटेत उजेड आला नि गर्दझाडीतली ही वाट संपत आल्याची चाहुल झाली.. ते नविन ट्रेकर्स तर भलतेच खुष झाले.. पण वरती पोहोचलो तर आम्ही फक्त घळीत येउन पोहोचलो होतो.. डावीकडे एक डोंगर नि उजवीकडे एक डोंगर.. जेमतेम ५ जण उभे राहु शकतील एवढीच जागा.. समोरील वाट पुन्हा जंगलात खाली उतरत होती.. हीच ती वांगणीवरुन वरती येणारी वाट.. जिथुन आम्ही खाली उतरणार होतो.. तिथुनच आम्ही उजवीकडे डोंगरावर जाणारी वाट चढु लागलो.. साहाजिकच मघाशी खुष झालेले नविन ट्रेकर्स 'हाय रे देवा' करु लागले.. फिदीफिदी

तसे आम्ही डोंगराच्या खांद्यावर पोहोचलो होतोच.. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलो होतो..

(क्षणभर विश्रांती..)
--------------------------
इकडुन पुढे जाउ लागलो नि एकदम वातावरण बदलु लागले.. गायब झालेला वारा सुटु लागला.. ढगांचे पुंजके भोवताली येउ लागले.. तेव्हा कुठे आम्हाला हायसे वाटले..
आम्ही चढत होतो पण ढगांच्या धुक्यामुळे कळत नव्हते कुठपर्यंत पोहोचलोय..
पुन्हा जोरकस वार्‍यामुळे ढगांचा पडदा बाजुला झाला नि बघतो तर समोरच चंदेरीचा सुळका !! च्यामारी पोहोचलोच होतो !

----------------------
तिथुन बाजुने जाणार्‍या वाटेने पाच मिनीटात गुहा लागली.. लांबीन भली मोठी असलेल्या ह्या गुहेतच महादेवाचे छोटे मंदीर आहे..

------------------------------

------------------------------
या गुहेजवळ पाण्याच्या टाक्या आहेत.. अर्थातच पिण्यायोग्य पाणी नव्हते.. मात्र तिथेच एका बाजुला खडकातुन झिरपणारे थंडा पाणी मस्तच !
या गुहेसमोरुनच निसर्गसौंदर्य पहायला मिळाले.. माथेरानची डोंगररांग, प्रबळगड-कलावंतीण असा बराच परिसर दिसुन आला..

-------------------------------------

इथेच बसुन आम्ही जेवण उरकले.. आमचे जेवुन झाले तरी मागे राहिलेल्या तुकड्या अजुन येतच होत्या.. काहिजण तर गुहेपर्यंत देखील आलेच नाहीत.. सुळक्याच्या बाहेरील परिसरातच ठाण मांडले.. अर्ध्यातासातच आम्ही परतीच्या वाटेला लागलो..

उतरताना एवढ्या मोठ्या ग्रुपची रांग नाही लागली तर नवलच.. दोन्ही बाजुस कारवीची झुडुपे नि त्यातुन ही जाणारी उतरणीची वाट.. वेळही लागत होता पुढे सरकायला..

----------------------------------------

-----------------------------------------
आम्ही टिपी म्हणुन बेसुर आवाजात धमालगाणी सुरु केली.. चढताना मी जराही भिजलो नव्हतो पाण्यात.. उतरताना मात्र ठरवले होते मार्गात येणार्‍या प्रत्येक धबधब्यात डुंबायचे..

इथेही वाट चढुन आलो तशीच होती सुरवातीला.. पण लवकरच धबधब्याचा मार्ग लागणार होता ज्याची आतुरतेने वाट बघत होतो..

ही वाट चढताना देखिल हालत आहे याची कल्पना आली.. आमची धमालगाणी सुरु होतीच.. लवकरच पाण्याचा खळखळाट ऐकु आला.. नि धबधब्याचे दर्शन झाले..

पटकन भिजुन घेतले.. आता पुढील मार्ग इथुनच खाली... काहि ठिकाणी तर मला ही वाट म्हणजे हरिश्चंद्रगडाला जाणार्‍या नळीच्या वाटेचे छोटे रुप वाटत होते.. मार्गाक्रमण करताना पाण्याची मजा लुटताना काही घरसरत होते हे सांगणे नकोच..

-------------------------------------

-------------------------------------

-------------------------------------

-----------------------------------

------------------------------------
वाटले शेवटपर्यंत हा मार्ग साथ देईल.. पण जवळपासा खाली उतरलो नि वाट डावीकडच्या जंगलात घुसली.. तिथुनच पाचेक मिनीटात आम्ही मोठ्याश्या पठारावर आलो..

हिरवेगार असे पठार फुटबॉलचे मैदानच भासत होते.. मागे वळुन पाहिले तर चंदेरीचा पुर्ण डोंगर नजरेत भरला.. आमची दिवसभरातील वाटचाल ह्या डोंगरावरच झाली होती.. फिदीफिदी

( डोंगर चंदेरीचा..)
----------------------------------------------

काहीकाळ विश्रांती घेउन आम्ही पुढे वाटचाल केली.. वीस पंचवीस मिनीटे चाललो तरी पठार संपत नाही..

( वाटेतच एका बाजुला दुरवर ही डोंगररांग दिसली.. डोंगररांग कसली सुळक्यांचा कारखाना भासत होता.. विचारले असता मललंगडची रांग आहे असे कळले..)

बाकी या पठारावर थोडीफार आजूबाजुस मोजकी झाडे लागतात तेवढेच.. इकडुनच पुढे वाटेला दोन फाटे फुटले होते.. दोन्हीकडुन गेले असता या वाटा खाली गावातच सोडतात..

आम्ही काही अवधीतच गाव गाठले ! आमच्या स्वागतासाठी गरमागरम पोहे नि चहा सज्ज होते.. तशी लिडरलोकांनी सोय करुन ठेवली होती.. आमचे खाउन झाले तर अर्ध्यापेक्षा जास्ती बरेच मागे होते.. उतरत होते..
आम्हाला घेण्यासाठी रिक्षा येणार होत्या.. तोपर्यंत आम्ही जवळच असलेल्या नदीवर जाउन मस्तपैकी फ्रेश झालो.. दिवसभरात केलेली तंगडतोड नि ओल्या बुटाने केलेला ट्रेक त्यामुळे पाय चांगलेच पांढरेफिके पडले होते.. तिथेच संथ प्रवाहाच्या नदीत सांजकाळी शांतपणे पाय बुडवून ठेवले.. काहिजणांनी इथेपण डुबकी मारलीच..

काही वेळेतच रिक्षा आली नि आम्ही वांगणी स्थानकाकडे कूच केले.. एकूण दिवसभरात धबधब्यांनी लखलखणारी चंदेरी पाहिल्याचे समाधान होते.. ज्यांना हा ट्रेक करायचा आहे त्यांनी वांगणीहुन जाण्याचे बघावे.. आपल्यामध्ये किती दम आहे याची कसोटी घेणारा ट्रेक आहे.. नि हो पादत्राणे चांगली नसतील तर आपटलाच समजा.. फिदीफिदी
चढताना वाटले तरच टो़कापर्यंत जा ! नाहितर धबधब्यापर्यंत जाउन "लख लख चंदेरी" म्हणत मजा करा.. स्मित