खरे तर आधीच्या विकेंडला केलेला "ढाक बहिरी" नि आता पुन्हा लगेच शुक्रवारी या ट्रेकला निघायचे !! माझ्या घरी ओरडा पडणार होता पण हा या मोसमातला शेवटचा ट्रेक म्हणुन जाहिर केले नि या ट्रेकमागचे निमित्तही सांगितले.. निमित्त म्हणजे ट्रेकमेटस ग्रुपचा पहिला वाढदिवस होता नि तारीख पण मस्त होती.. १४ फेब्रुवारी.. प्रेमदिन.. म्हटले आपल्यासारख्या सिंगल सिटीजनलोकांना निदान ट्रेकींग करुन तरी ''प्रेमदिन'' घालवता येईल
"शक्यतो हा ट्रेक चुकवु नका, स्पेशल आहे " असे लिडर्सलोकांनी सांगुन सगळ्यांची उत्सुकता अजुनच वाढवली होती.. म्हटले स्पेशल असले तर फारतर केक असेल नि केक कापायचा झाला तर वरती तो नेणार तरी कसा ?? असे अनेक प्रश्न्न नि तितकीच उत्सुकता लागुन राहिलेली..
१२ फेब्रु.च्या रात्री दादरहुन शेवटची कसारा लोकल पकडली.. इथेच कधी नाही ते आम्ही चक्क १०-१२ जण होतो.. म्हटले येणार्यांचा एकूण आकडा मोठा असणार.. कल्याण येइपर्यंत आमचा डबा भरुन गेला नि आमची टोटल झाली ४२ ! त्यात बरेच जणांनी ऐनवेळी येण्याचे कॅन्सल केले नाहीतर पन्नाशी सहज होती !
पण या जमलेल्यांमध्ये प्रमुख आकर्षण होते "बादशहा" ! बोले तो कुत्र्याचे नाव ! एकजण आपल्यासोबत थेट ट्रेनमध्येच त्या बादशहाला घेउन आला होता ! आम्ही उडालोच 'काय, कुत्र्याला घेऊन ट्रेक !!!' तोदेखील पाळीव कुत्रा ज्याला डोंगरदर्यांचे काहि माहीत नाही.. तो पण अगदी नावाप्रमाणे ऐटीत गुपचुक मालकाच्या सिटखाली जाउन पहुडला.. ! त्याला माहितही नसेल आपण कुठे जाणार आहोत !
जसे एकेक स्टेशन मागे पडत चालले तसे वार्याचा जोर वाढु लागला नि साहाजिकच आमच्या डब्याचे सर्व दरवाजे बंद झाले ! नि ते उघडले गेले कसारा स्टेशन आल्यावरच ! तिथेच चार जीप बोलवण्यात आल्या होत्या.. सगळ्या बॅगा नि सामान्(यांत काहितरी स्पेशल दडलय कळंत होत) व्यवस्थित बांधुन आम्ही आंबेवाडीला(अलंग-मदन्-कुलंग च्या पायथ्याशी असलेले गाव) प्रयाण केले ! तत्पुर्वी एका धाब्यावर चहाब्रेक झाला नि तिथेच ग्रुपमधील एकीचा असलेला वाढदिवस केक कापुन साजरा केला गेला.. तिने आणलेल्या छोटुश्या केकवर सगळ्यांनीच मोठा हात मारला... त्यामुळे ज्यांनी शेवटी हात मारला त्यांना केकखालचा पुठ्ठा मिळाला
आंबेवाडीला पोहेचेपर्यंत १३ फेब्रु.ची पहाट होण्याची वेळ झाली होती.. साडेतीनच्या सुमारास आम्हाला सोडुन जीप माघारी फिरल्या.. नेहमीप्रमाणे टॉर्चच्या प्रकाशझोतात ओळखपरेड झाली.. नि मग सगळ्यांना तिथेच क्षणभर विश्रांती घेण्याचे सांगितले.. जल्ला आधीच झोपेचं खोबरं नि अंगात शिरशिरी आणणारी थंडी नि अशा हालतमध्ये बसायचे म्हणजे लै...... झकास वर्तुळाकारात बसुन मध्यभागी सगळ्या बॅगा ठेवण्यात आल्या.. एकावर एक अशा सॅक्स रचुन त्यावर केक ठेवण्यात आला.. ह्म्म्म.. म्हणजे वाढदिवस इथे पायथ्याशी ! शंकेचे निरासन झाले.. 'केक घेउन वरती जाणे कठीण' नि 'सगळ्यांसाठी आणलेल्या पॅस्ट्रीजचे वजन' हे पाहता इकडेच आकाशातील चांदण्याच्या समक्ष सोहळा पार पडण्याचे ठरले..
आंबेवाडीला पोहेचेपर्यंत १३ फेब्रु.ची पहाट होण्याची वेळ झाली होती.. साडेतीनच्या सुमारास आम्हाला सोडुन जीप माघारी फिरल्या.. नेहमीप्रमाणे टॉर्चच्या प्रकाशझोतात ओळखपरेड झाली.. नि मग सगळ्यांना तिथेच क्षणभर विश्रांती घेण्याचे सांगितले.. जल्ला आधीच झोपेचं खोबरं नि अंगात शिरशिरी आणणारी थंडी नि अशा हालतमध्ये बसायचे म्हणजे लै...... झकास वर्तुळाकारात बसुन मध्यभागी सगळ्या बॅगा ठेवण्यात आल्या.. एकावर एक अशा सॅक्स रचुन त्यावर केक ठेवण्यात आला.. ह्म्म्म.. म्हणजे वाढदिवस इथे पायथ्याशी ! शंकेचे निरासन झाले.. 'केक घेउन वरती जाणे कठीण' नि 'सगळ्यांसाठी आणलेल्या पॅस्ट्रीजचे वजन' हे पाहता इकडेच आकाशातील चांदण्याच्या समक्ष सोहळा पार पडण्याचे ठरले..
टाळ्यांच्या कडकडाटात नि हॅप्पी बर्थडेच्या गजरात केक कापला गेला.. कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट सुरु झाला.. नि पहाटेच्या ४ वाजता बर्थडेकेक खाणे सुरु झाले !! तिथेच नाश्त्याचे पाकीटही देण्यात आले ! नि सरप्राईज गिफ्ट म्हणुन प्रत्येकाला एकेक ट्रेकमेटस नावाचे टिशर्ट देण्यात आले !! लै भारी ! नशिब आमचा हा सोहळा गावाच्या अगदी एका टोकाला (अलंग्-मदन्-कुलंगनजिकच्या) होता नाहितर अख्खे गाव हजर झाले असते केक खायला
आकाशात तांबडं पसरलं नि सॅक्स आमच्या पाठीवर आल्या ! निघण्यापुर्वी एका लिडरने थोडीशी तोंडओळख करुन दिली कुलंगबद्दल ! नि 'लेटस गो' म्हणत आम्ही पुढे सरसावलो ! इतक्या मोठ्या ग्रुपबरोबर नि कुत्र्याबरोबर ट्रेक करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती ! पहाटेच्या तांबड्या प्रकाशात थंडगार झुळुक अंगावर घेत चालणे ही एक पर्वणीच असते !
(कुलंगच्या दिशेने आगेकुच)
काहिअवधीतच कुलंग अगदी जवळ भासु लागला ! नि आम्ही आज येतोय या आनंदाच्या बातमीनेच जणु काही कुलंगवरुन आकाशात रॉकेट सोडण्यात आले ! जे शेवटी कळसुबाईच्या शेंड्यावरुन क्षितीजाला भिडले..
(डावीकडुन : अलंग , मदन नि कुलंग)
-----
(कळसुबाईवरुन क्षितीजाला भिडणारे रॉकेट !)
अर्ध्या तासातच आम्ही कुलंगच्या पायथ्याशी विसावलेल्या जंगलात हात घातला.. ह्या कुलंगचे वर्णन करायचे तर अर्धा भाग झाडीझुडुपात झाकलेला नि वरील भाग खडकाळ.. जिथेच शेंड्यावरती जाण्यास पायर्या कोरलेल्या आहेत !!
आमचे चालणे सुरुच होते पण अजुन कसलाही चढ आडवा आला नव्हता.. पंधरा-वीस मिनीटातच एक सोप्पा चढ लागला.. तो चढ पार करताच आमचा ट्रेक मेळा विश्रांतीसाठी थांबला..
इथेच वाटेत लागणारे पहिले नि शेवटचे पाणी थोड्याफार प्रमाणात डबक्याच्या स्वरुपात (दगडातुन झिरपणारा झरा) उपलब्ध आहे.. तिथेच थांबुन छोटेखानी पेटपुजा केली गेली नि पुढच्या वाटेला चालु पडलो..
आता वाट जरा अरुंद होत गेली नि आजुबाजूची झाडी आता आमच्याशी अंगलट करु लागली.. पण त्रास कसलाच नव्हता.. ना उन्हाचा ना वाटेचा..
ही पाउलवाट बहुतांशी लाल मातीची आहे.. नि अधुनमधून बरेच चढउतार लागतात.. पण झाडीझुडूपातुन जाणारे हे चढ- उतार पार करताना नवखे ट्रेकर चाचपडले नाही तर नवलच पण या जंगलातुन जाताना कळत नव्हते की आम्ही केवढी उंची गाठत आहोत.. अर्ध्याएकतासातच आम्ही अधुन मधुन छोटेछोटे ब्रेक घेत जंगल मागे टाकले.. आतापर्यंत ग्रुपची नेहमीप्रमाणे फाळणी झाली होती.. फ्रंट लिड करणारे पुढे तर बॅक लिड करणारे मागे हळुहळु रमतगमत येत होते.. घाई कोणालाच नव्हती..
जंगलातुन चढुन आल्यावर मागे पाहिले तेव्हा कळले बरेच चढुन आलो आहोत..
नि वरती बघितले तर आता उन्हातुनच पुढची चढाई करायची होती.. इथेच पहिल्यांदा अधुनमधुन कोरलेल्या पायर्यांचे दर्शन होते.. आमच्यातले बरेचजण पुढे गेले होते..
इथवर जाताना बर्याचजणांनी आपाआपल्या कुवतीनुसार सुकी लाकडे घेतली होती..
आता चढताना मात्र जिथे थोडीफार सावली मिळेल तिथे आराम करुन सगळे पुढे सरकत होते.. अधुनमधुन खादाडणे चालुच होते.. मघाशी दिसलेल्या पायर्यांना वळसा घालुन पुढे गेल्यावर कुलंगचा शेवटचा टप्पा नजरेस पडला.. नि गेले तीन-चार तास चढण्यात कधी गेले ते कळलेच नाही.. इथुन पाउलवाट संपते नि बहुतांशी कोरलेल्या अरुंद अशा पायर्यांची वाट लागते.. ह्या पायर्या चढताना अगदी समांतर रेषेतच मदन समोर उभा दिसत होता..
काहि मिनीटातच पायर्यांचा शेवटचा टप्पा लागला.. इथपर्यंत आमच्यासोबत असलेला "बादशहा"देखील पण सफाईने चढुन आला होता.. तसा तो थोडाफार धापा टाकत होता.. (मनातुन नक्कीच मालकाला शिव्या घालत असणार.. )
__________________
--------------------------------
या ठिकाणीच जरा जपुन चढावे लागते.. हा शेवटचा टप्पा..
या पायर्या पार करुन वर येतानाच कुलंगची तटबंदी नजरेस पडली.. एकदाचे पोहोचलो वरती.. तोवर सुर्यदेखील डोक्यावर आला होता..
इथुनच आमचा मोर्चा उजवीकडे वळाला जिथे प्रशस्त गुहा आमची वाट बघत होती. आत जाउन बघितले तर आमच्यातले पुढे आलेले दोघे तिघे आहे त्याच अवस्थेत डाराडुर झाले होते.. बाकी सगळे आल्यावर प्रत्येकाने आपापले डबे उघडण्यात आले नि एकत्रित पेटपुजा करण्यात आली.. एव्हाना दीड वाजत आला होता... त्यामुळे तसा अख्खाच दिवस हाती होता.. !!
रात्री जागरण होईल म्हणुन मीदेखील थोडीशी डुलकी काढुन घेतली... तर काहीजण कुंभकरण बनले होते.. उठल्यानंतर पाहिले तर काही उत्साही मंडळी तर पोहोण्यासाठी गेले होते.. अलंगप्रमाणेच इथेहीपाण्याच्या बर्याच टाक्या आहेत.. काही पिण्यासाठी उपयुक्त तर काही पोहोण्यासाठी !!
(पाणी पिण्याचे टाके)
----------
(कुलंगवरची गुहा )
या कुलंगचा विस्तार जवळपास अलंगसारखाच आहे..प्रत्येकजण (झोपणारे सोडुन) इथे ना तिथे उंदडायला गेला होता.. गुहेच्या उजवीकडुन गेले असता छोटा कुलंग बघायला मिळतो.. इथे मी एका ट्रेक मेटला घेउन गेलो.. या छोट्या कुलंगवर जायचे तर वाट थोडी खाली सरकते नि अगदी टोकाशी जाउन खाली पाहिले तर मस्तच नजारा बघावयास मिळाला.. मी इथे येताना कॅमेरा नेला नव्हता त्यामुळे फोटो काढायचे राहुन गेले (कुणाकडेच इकडचा फोटो मिळाला नाही)
तिथुन परत आलो नि चहाची आतुरतेने वाट पाहु लागलो.. चहा घेउन बसल्या बसल्या सुर्यास्त दिसणार होता.. इतक्या उंचीवर आल्यावर सनसेट पॉईंटची गरजच नव्हती ! चहाच्या वेळेवर पुन्हा सगळे फ्रेश होउन चुलीच्या भोवताली जमले.. बिस्किटाच्या खुराकावर ताव मारुन पुन्हा सगळे खोली मोजण्यासाठी विखुरले गेले.. आता सुर्यास्त जवळ येउन ठेपला होता..
-----
लाकडं कमी पडत असल्याने आमच्यातले काही अनुभवी ट्रेकर्स टॉर्च घेउन पुन्हा खाली उतरले होते.. लाकडं आणायची तर पुन्हा अर्धा गड खाली उतरावा लागणार होता.. नि येताना टॉर्चच्या प्रकाशात लाकडं घेउन अंधारात वरती यायचे होते.. !!! एवढे सगळे करायचे म्हणजे खरच ग्रेट ! या कष्टाळु मित्रांना मानले बुवा !
जसा सुर्य मावळला तसे वार्याने हवेत गारवा पसरवण्याचे काम सुरु केले.. पुन्हा सगळे आपापले नि सुर्यास्ताचे फोटोसेशन आटपुन गुहेपाशी जमले.. आता दोनच काम सगळ्यांकडे उरले होते ते म्हणजे जेवण बनवा नि गप्पाटप्पा.. पण गंमत म्हण़जे दोन्ही काम आजुबाजुलाच गुहेबाहेर पार पाडायची होती.. नि आम्ही लागलीच आमच्या दोन्ही कामाचा खेळ मांडला.. पहिलाच वाढदिवस म्हणुन जेवणासाठी खास नविन भांडी आणली होती.. त्यामुळे फोडणी घालुन उद्घाटन करण्यास सारेजण उत्सुक होते.. जेवणाचे साहित्य पटापट बाहेर काढण्यात आले.. फोडणी घातली.. तेलाचा आवाज झाला.. नि सगळ्यांनी शिट्ट्या मारत आरोळ्या ठो़कत एकच जल्लोष केला.. !! इतके जंगी उद्घाटन बघून जल्ला त्या निर्जीव भांड्याला पण गहिवरुन आले असेल मेनुपण झकास होता.. व्हेज बिर्यानी,सोयाबिन-बटाट्याची भाजी नि निखार्यांवर भाजलेले पापड.. नि सोबतीला गावातुन आणलेल्या भाकर्या ! आहाहा !
एकीकडे टॉर्चच्या प्रकाशात जेवण सुरु होते...
नि दुसरीकडे अंधारातच टॉर्चच्या कॄपेने ड्रम शराद चा खेळ सुरु होता.. गडबड गोंधळ चालु होता.. एकंदर सेलिब्रेशन जोरात सुरु होते ! आतापर्यंत केवळ मालकाभोवती घुटमळणारा बादशहा पण आता सगळ्या ग्रुपला सरावला होता.. हा बादशहा इतका थंड होता की जराही भुंकणे नाही.. गुरगुरणे नाही.. खुपच प्रेमळ होता !
काहीवेळेतच बिर्यानीचा वास सुटला नि सगळ्यांनी आपआपल्या प्लेटस काढल्या.. जेवणखाणे आटपले नि कॅम्प फायरचा कार्यक्रम सुरु झाला.. गाणीगप्पांचा कार्यक्रम सुरु झाला नि माझे डोळे पेंगु लागले.. मस्त थंडगार वारा सुटला होता.. तोच एक आवाज झाला.. "अरे तिकडे आग लागलीय.. विझवा लवकर " सगळे सावध झाले.. काहिजण आग विझवण्यासाठी त्या दिशेने पटकन पुढे सरसावले.. अंधारात दुरवर एक आग पेटताना दिसली.. क्षणातच अंधारातून एक बाई सदृश आकृती तिथे आली नि ती आपल्या ओढणीला वार्याच्या झोतात धरुन आगीभोवती नृत्य करु लागली..!!!! एवढ्या अंधारात अचानकपणे विचित्र हावभाव आवाज करत नाचणारी ही बाई बघुन पाहणार्यांचे डोळे विस्फारलेच.. रामसे बंधुच्या भुतपटापेक्षा भयाण चित्र समोर बघत होतो.. तोच एक म्हणाला 'अरे हा तर आपला भंडारी' (आमच्याच ग्रुपमधला एक उत्साही प्राणी).. झाले सगळ्यांनी तिकडे धाव घेतली.. हा वेडाप्राणी बाईचा आवाज काढत नाच करत होता.. ह्या मित्राचे वैशिष्ट असे की काहिना काहि असा "भयानक" मेकअप करुन सगळ्यांना घाबरवयाचे ! त्याला बघुन तर काहिजणांचा विश्वासच बसत नव्हता की तो आपल्यातलाच आहे.. इतका सुंदर (!!) मेकअप झाला होता ! मी तर मनात म्हटले "आम्हाला जल्ला इथे ब्रश करायचा कंटाळा.. नि हा भाई मेकअपचे सामान काय आणतो.. मेकअपसाठी शेविंग काय करतो नि ड्रेस काय घालतो !! च्यामारी ! " मान गये दोस्त !! ह्याला म्हणतात हौशी माणूस ! हा त्याचा खास काढलेला फोटु..
इतके सगळे झाले नि मग गुहेत झोपी गेलेल्यांना घाबरवले नाही तर नवलच ! एकुण खुप धमाल चालु होती.. शांत, दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याला आज आम्हा ट्रेकर्समंडळीमूळे गजबजाट अनुभवता आली असेल.. रात्रीचे बारा वाजत आले होते.. तोच लिडरलोकांनी खास बाराच्या ठोक्याला कापण्यासाठी सांभाळुन आणलेला छोटुसा केक समोर ठेवला ! पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा नि त्याचबरोबर प्रेमदिनाच्या शुभेच्छा देखील एकमेकांना देण्यात आल्या ! एवढ्यात सोहळा संपणार नव्हता कारण.. "बदामी मिल्क" चा मेनु समोर ठेवण्यात आला.. खाण्याची तर चंगळच सुरु होती.. पुन्हा सगळे रीफ्रेश झाले.. नाचगाण्याचा छोटुसा कार्यक्रमपण झाला.. मध्यरात्र उलटुन गेली नि बरेचजणांना झोपेने हळुहळू साद देण्यास सुरवात केली.. तरीही काही उत्साही मंडळी शेकोटीभोवती बसुन भुताच्या गोष्टी करतच होते !!
उद्या लवकर उठुन सुर्योद बघण्याच्या इराद्याने मीदेखील आडवा झालो.. नि उठलो ते चक्क उजाडल्यानंतर.. माझा सलग तिसर्यांदा पोपट झाला होता ! हरिश्चंद्रगड, अलंग-मदन नि आता कुलंग ! तिन्हीवेळा मिसलो.. मोबाईलमध्ये गजर लावुनसुद्धा काही फायदा झाला नाही ! उठल्यावर लगेच मी आणि दोघेचौघे गुहेच्या डाव्या दिशेने गेलो.. जिथुम अलंग-मदन नि इतर डोंगराळ परिसर जवळुन बघायचा होता !
(समोर मदन नि मागे "C" आकारात भासणारा अलंग)
इथे पोहोचल्यावर बराच काळ सभोवतालचा परिसर न्याहाळण्यात गेला.. इकडुन अलंग-मदन समोर झकासपणे दिसत होते.. जिथे दिडेक महिन्यापुर्वीच जाउन आलो होतो ! तर सभोवताली ढगांचा डोंगरदर्यांतुन सुर्यकिरणांशी लपाछुपीचा खेळ सुरु होता..
सगळे न्याहाळुन झाले नि आमचे स्टाईलिस्ट फोटोसेशन सुरु झाले ! अशा सकाळच्या वेळेत डोंगरदर्याच्या पार्श्वभुमी ठेवुन फोटो काढणे नि काढुन घेणे कोणाला नाहि आवडणार.. त्यात माझी उडी ठरलेली !
(आकाशातुन लॅन्डींग करताना !! )
______________
पोटात भुक कडाडली नि लगेच गुहेची वाट धरली.. काय करणार ! सकाळची न्याहारी चुकवायची नव्हती.. चहा नि पोहे असा भक्कम नाश्ता झाला.. पुन्हा एकदा ग्रुप फोटो झाला.. ! वेगवेगळ्या पोझमध्ये फोटुज झाले नि आम्ही आवरायला सुरवात केली.. मुख्यत्वे प्लॅस्टीक वा इतर काही पडलेला कचरा उचलण्यात आला (आमच्या दृष्टीने ही सर्वात महत्त्वाची बाब.. मग बाकीचे आवरायचे.. )
-------------------------------
(धमालमस्तीची काही क्षणचित्रे !!
पुन्हा साडेदहाच्या सुमारास आम्ही उतरण्यास सुरवात केली.. सगळ्यांचा उत्साह मात्र कायम होता.. जोरजोरात गाणीगप्पा मारत आम्ही खाली कधी पोहोचलो ते कळलेच नाही ! गावात पोहोचेस्तोवर संध्याकाळचे चार वाजले होते.. नि अपेक्षेप्रमाणे एकीकडे कोंबडी शिजवली जात होती तर एकीकडे डाळभात बनला जात होते ! फावल्या वेळेत सगळे आराम करत घरच्या अंगणात पडले होते.. जेवण आटपले.. चहा झाली.. नि आम्हाला कसारा स्टेशनला पोचवण्यासाठी दोन गाड्या हजर झाल्या.. ! संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गावाला आम्ही रामराम केला नि परतीची वाट धरली !
एकंदर हा ट्रेक चांगलाच स्मरणात राहण्यासारखा झाला.. ज्यात केवळ ट्रेकिंगच नव्हते तर धमालमस्तीचे अनोखे कार्यक्रम देखील पार पडले होते.. जवळपास एक दिवस आम्ही कुलंगवर काढला होता.."अलंग-मदन-कुलंग" हे दुर्गत्रिकुट सर केल्याचे खुप समाधान होतेच पण त्याची सांगता अशा दिमाखदार ट्रेकने व्हावी हे अविस्मरणीयच !! त्यामुळे हा प्रेमदिन देखील चांगलाच लक्षात राहील.. ऑल इन वन.. "प्रेमदिन, सेलिब्रेशन नि कुलंग !"
12 comments:
Hey dat was a grt effort...a nice innitiative by "Trek Mates India"..as its now known...but cudnt read nethin :(..plz nxt tym put it in english coz the non marathi trek mates can get it too...congrats again:):):) !!!
superb work viki....
@ Jhanvi: Surely dear...We are open to three languages Hindi, Marathi and English...
I hope Jhanvi would ask for Guju language as well.
GR8 EFFRTS ....GYS ...
ONE DAY I'LL BE PART OF UR TEAM.
thanx vickram...:):)
@nilesh gujju me likhne ke liye u hav no writer xcept me;)...n also no one to understand too!
Gud work Vikram...n' nicely written dear Yo! :D
Chanach lihila ahes..awesome trek..Even i wanna go with u guys...
Mondblowing memories. :)
Author Yogi aka Yo rocks.. He really rocks.. :)
Appu really, unforgettable memories.. :)
well done trek mates..
Post a Comment