Sunday, July 4, 2010

"लख लख चंदेरी"

शनि-रविवारी "राजगड" चा मस्त ट्रेक झाला होता.. हँगओवर उतरला नव्हता.. त्यातच माझा नेहमीचा ग्रुप "ट्रेकमेटस" चा समस आला की 'येत्या रविवारी चंदेरी ट्रेक.. !'.. झाल्लं म्हटले आता बॅक टू बॅक ट्रेक होणार तर.. पण ठरवले जर शुक्रवारपर्यंत पाउस पडला तरच जायचे !
पावसाने मुंबईत भलतीच विश्रांती घेतली होती त्यामुळे शेवटी चंदेरी नको असे वाटु लागले.. कारण पावसाशिवाय चंदेरीला जाणे म्हणजे वेडेपणाच ! पाउस नाही तर चंदेरी ट्रेकला सर नाही.. तेव्हा "नाही" चा विचार चालु असतानाच शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार पुनरागमन केले.. शनिवारीदेखील चालूच राहिला.. मग काय.. लगेच फोन करुन नाव नोंदवले !

चंदेरी हा गड म्हणुन गणला जातो पण फारसा इतिहास कुठेच आढळत नाही.. त्या काळातील लष्करी चौक असावी असे म्हटले जाते.. तरीदेखील चंदेरी हा ट्रेकर्समंडळीमध्ये प्रसिद्ध आहे.. पण पावसातच काय ती मजा !! कारण मार्गात लागणारे अनेक धबधबे ! पाण्यातून जाणारा मार्ग ! तेव्हा मौजाही मौजा ! फिदीफिदी

चंदेरी ट्रेक हा तसा मध्यम-कठीण श्रेणीचा मानला जातो.. चढताना लागणारी निसरडी वाट नि पाण्यातुन असणारा चढ म्हणुन हा ट्रेक मध्यम ते कठीण श्रेणीत येतो.. या गडावर जाणे म्हणजे तिथे असलेल्या सुळक्यापाशी पोहोचणे ! त्यामुळे साहाजिकच मी फार उत्सुक झालो होतो.. म्हटले फार कमीजण येतील.. पण संख्या कानावर आली १०० !!! च्यामारी जत्रा !!!!

ह्या चंदेरीवर जाण्यासाठी ट्रेकर्समंडळी मुंबई-कर्जत रेल्वेमार्गावर असणार्‍या 'वांगणी' रेल्वेस्थानकावर उतरुन तिकडची वाट (वांगणी- गोरेगाव- पायथ्याचे गावःचिंचोली) पकडतात.. पण आमचे उलटे होते.. पनवेलवरुन जायचे ठरले होते.. ह्या वाटेचा कोणी फारसा वापर करत नाही.. तशी माहितीसुद्धा फार कुठे मिळाली नाही.. त्यामुळे वाट कशी असणार याबद्दल औत्सुक्त्य होते..

पनवेल एस्टी स्टँडला सकाळी ६.५० वाजता पोहोचायचे म्हणजे मोठे आव्हान होते.. पण नंतर कळले दहिसर-गोरेगावातुन पण ५-६ जण येताहेत तेव्हा थोडे हायसे वाटले.. सकाळी ५ ची एस्टी पकडुन रवाना झालो.. थोडे टेन्शन होते मला.. वाटेचे नाही तर येणार्‍यांचा एकुण आकडा बघून ! त्यातच ही वाट कठीण !! पनवेलला पोहोचलो नि आमचे "एओ" "एओ" चे साद-प्रतिसाद चालु झाले.. क्षणातच ठाण्या-कळव्यावरुन येणारी मंडळीदेखील हजर झाली.. मग काय स्टॅंडवर फक्त ट्रेकमेटसवाले नि ट्रेकमेटसवालेच ! पावसाची रिपरिप चालूच होती.. हजेरी झाली.. आदल्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे २० जण कटाप झाले नि संख्या ८० वर स्थिरावली.. ! हुश्श.. ! हेही नसे थोडके !

पण तिकडे पोहोचताच जुने -पुराणे ट्रेक मेटस भेटले.. नि ट्रेकच्याच गप्पाटप्पा सुरु झाल्या.. तिकडुन लवकरच आम्ही स्टँड खाली केले.. (फिदीफिदी) नि जवळच एका रोडजवळ टमटमची वाट पाहू लागलो.. पाचेक मिनीटातच ४-५ टमटम येउन धडकल्या नि आम्ही ताम्हसई गावाकडे(पायथ्याचे गाव) कूच केले..

अर्ध्यापाउणतासातच आम्ही त्या छोट्या गावात येउन पोहोचलो.. त्या गावातील लोकसंख्या आमच्या ग्रुपपेक्षा कमी असावी कदाचित !! तेथील शाळेच्या आवारत आम्ही वर्तुळ केले नि धमाल ओळखपरेड सुरु झाली..

नाश्त्याचेदेखील वाटप त्याचवेळी झाले.. यावेळेसही बरेच जण पहिल्यांदा ट्रेक करत होते.. (च्यामारी.. ) आमच्या ग्रुपमध्ये फक्त दोघेचजण या वाटेने गेले होते नि तेच आम्हाला लिड करणार होते..

चहापाणी आटपली नि आम्ही तासभरातच ट्रेक सुरु केला.. वाटेची सुरवातच पाण्यात पाय टाकुन होणार होती.. ! लै थंडगार !!!

------------------------

शाळेतल्या मुलांप्रमाणे सगळे एकेक करुन बांधवरुन जाउ लागले.. आमच्यातले काही पठ्ठे तर आताच डुबक्या घेत मजा करु लागले.. ! तिकडुनच पुढे पुन्हा एक छोटेखानी ओढा आडवा आला.. तो पार करुन पसरलेल्या हिरवळीतून जाउ लागलो..

समोर डोंगर ढ्गाआड हे सांगायला नकोच ! चंदेरी नक्की कुठला ते कळत नव्हते !..
थोडाफार चढ लागला नि ८० च्या ग्रुपचे १० -१० जणांत तुकडे पडले !! फिदीफिदी

अर्ध्यातासातच गर्द झाडीतुन दोन विंहगमय धबधब्याचे दर्शन झाले.. !

ते बघताच सगळ्यांची पावले झपाझप पडु लागली.. तसतसा पाण्याचा खळखळाट येवु लागला.. पाचेकमिनीटातच वाट चक्क वाहत्या पाण्यात उतरली.. ! सह्ही !!
पाणी फारसे नव्हते.. पण गुडघ्याभर होते.. पाण्याचा प्रवाह जोरदार होता.. नि अर्थातच शेवाळ धारण केलेले खडकदेखील आम्हाला पाडायला, अडथळा आणायला तयार होते.. ! पण असले ठि़काण लागल्यावर कोण घाबरतय.. नुसती दे धमाल सुरू..

----------------------

---------------------

--------------------

प्रत्येक ग्रुपमध्ये फोटोसेशन जोरदार सुरु होते.. कल्लोळ सुरु झाला.. कोण एक दुसर्‍याला मदत करत होता.. कोण स्वत:चा फोटो काढुन घेत होता.. कोणी पाण्यात डुबक्या मारुन घेत होते.. तर कोणी चलो आगे बढो.. पुढे चला म्हणत ग्रुपला पुढे ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.. फिदीफिदी

मला तर ते डोळ्यासमोर कोसळणारे मोठे धबधबे खासच वाटले.. होतेच तसे.. सभोवर हिरवाईमध्ये लक्षवेधी ठरत होते..

-----------------------

----------------------

---------------------

------------------

क्षणभर वाटले ही वाट तिकडेच जाते की काय.. फारसे लांब नव्हते.. नि झालेही तसेच.. आम्ही त्याच दिशेने खेचले गेलो.. पण वेळीच एकाच्या लक्षात आले की पुढे गेलेले अर्धेजण डावीकडे जंगलात घुसलेत.. नि आम्ही दिशा बदलली.. मागे वळुन पाहिले तर अर्ध्यापेक्षा पब्लिक मागेच होता.. यथेच्छ मौजमस्ती सुरु झाली होती.. तर आमच्या पुढची मंडळी तर एव्हाना जंगलात गायब झाली होती..

जंगल सुरु झाले नि वाटेत झाडाझुडूपांचा अंधार आला.. बर्‍यापैंकी निसरडी, चिखलमातीची चढ असणारी वाट (सरळ चढ आहे) चढुन गेलो नि गर्दझाडीच्या जाळ्यातून बाहेर आलो.. बघतो तर उजवीकडे तेच दोन धबधबे नजरेखाली.. लै क्लास !

--------------------------------------------
इथुनच या धबधब्याच्या पाण्याचे पात्र दिसुन आले.. इथुनच आम्ही वाट तुडवत आलो होतो..

--------------------
बाजुच्याच ङोंगराच्या काळ्या खडकावर पांढर्‍या रेघांचे चलचित्र उमटले होते..

तेच धबधबे उजवीकडे ठेवत आम्ही पुढची वाट पकडली.. पुन्हा तशीच चिखलवाट.. चढण पार करुन पुन्हा उतार.. नि इथे इटुकला असा धबधबा.. पण पाण्याचा प्रवाह लै स्पीडमध्ये !

------------------

------------------

पुन्हा काहिजणांनी इकडे ब्रेक घेतला..मी तिथे न थांबताच पुढे गेलो.. पुन्हा वाट जंगलात शिरली.. दोन्ही बाजुला खांद्याला लागणारे जंगल नि त्यातुन चढणाच्या असलेल्या वाटेने जाउ लागलो.. हा टप्पा तर खुपच दमछाक करणारा आहे.. पुन्हा एकदा गर्दझाडीचे छप्पर लागले नि उजेड कमी झाला.. वातावरण जरी पावसाळी असले तरी पाउस केव्हाच थांबला होता.. पण वाट चिखलात मळलेली.. त्यात ओले मोजे नि भिजलेले बुट... वाराही नव्हता..साहाजिकच घामाच्या धारा वाहु लागल्या.. या टप्प्यात माझ्या आसपास कोणीच नव्हते.. ग्रुपमधल्या दोन तीन तुकड्या पुढे गेल्या होत्या तर मागेच अर्ध्यापेक्षा जास्त पब्लिक राहिला होता.. म्हटले हे लोक्स चढुन वरती येणार कधी ?? ही कंटाळवाणी वाट कधी संपतेय असे झाले होते.. थांबायचे म्ह्टले तर मच्छर तयार भुणभुणायला.. लवकरच पुढे गेलेल्या एका तुकडीला जाउन मिळालो.. ह्या तुकडीत बरेच नवखे असल्याने ते खुपच त्रस्त झाले होते.. कधी येणार चंदेरी म्हणत चढत होते..

अर्ध्यातासातच वाटेत उजेड आला नि गर्दझाडीतली ही वाट संपत आल्याची चाहुल झाली.. ते नविन ट्रेकर्स तर भलतेच खुष झाले.. पण वरती पोहोचलो तर आम्ही फक्त घळीत येउन पोहोचलो होतो.. डावीकडे एक डोंगर नि उजवीकडे एक डोंगर.. जेमतेम ५ जण उभे राहु शकतील एवढीच जागा.. समोरील वाट पुन्हा जंगलात खाली उतरत होती.. हीच ती वांगणीवरुन वरती येणारी वाट.. जिथुन आम्ही खाली उतरणार होतो.. तिथुनच आम्ही उजवीकडे डोंगरावर जाणारी वाट चढु लागलो.. साहाजिकच मघाशी खुष झालेले नविन ट्रेकर्स 'हाय रे देवा' करु लागले.. फिदीफिदी

तसे आम्ही डोंगराच्या खांद्यावर पोहोचलो होतोच.. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलो होतो..

(क्षणभर विश्रांती..)
--------------------------
इकडुन पुढे जाउ लागलो नि एकदम वातावरण बदलु लागले.. गायब झालेला वारा सुटु लागला.. ढगांचे पुंजके भोवताली येउ लागले.. तेव्हा कुठे आम्हाला हायसे वाटले..
आम्ही चढत होतो पण ढगांच्या धुक्यामुळे कळत नव्हते कुठपर्यंत पोहोचलोय..
पुन्हा जोरकस वार्‍यामुळे ढगांचा पडदा बाजुला झाला नि बघतो तर समोरच चंदेरीचा सुळका !! च्यामारी पोहोचलोच होतो !

----------------------
तिथुन बाजुने जाणार्‍या वाटेने पाच मिनीटात गुहा लागली.. लांबीन भली मोठी असलेल्या ह्या गुहेतच महादेवाचे छोटे मंदीर आहे..

------------------------------

------------------------------
या गुहेजवळ पाण्याच्या टाक्या आहेत.. अर्थातच पिण्यायोग्य पाणी नव्हते.. मात्र तिथेच एका बाजुला खडकातुन झिरपणारे थंडा पाणी मस्तच !
या गुहेसमोरुनच निसर्गसौंदर्य पहायला मिळाले.. माथेरानची डोंगररांग, प्रबळगड-कलावंतीण असा बराच परिसर दिसुन आला..

-------------------------------------

इथेच बसुन आम्ही जेवण उरकले.. आमचे जेवुन झाले तरी मागे राहिलेल्या तुकड्या अजुन येतच होत्या.. काहिजण तर गुहेपर्यंत देखील आलेच नाहीत.. सुळक्याच्या बाहेरील परिसरातच ठाण मांडले.. अर्ध्यातासातच आम्ही परतीच्या वाटेला लागलो..

उतरताना एवढ्या मोठ्या ग्रुपची रांग नाही लागली तर नवलच.. दोन्ही बाजुस कारवीची झुडुपे नि त्यातुन ही जाणारी उतरणीची वाट.. वेळही लागत होता पुढे सरकायला..

----------------------------------------

-----------------------------------------
आम्ही टिपी म्हणुन बेसुर आवाजात धमालगाणी सुरु केली.. चढताना मी जराही भिजलो नव्हतो पाण्यात.. उतरताना मात्र ठरवले होते मार्गात येणार्‍या प्रत्येक धबधब्यात डुंबायचे..

इथेही वाट चढुन आलो तशीच होती सुरवातीला.. पण लवकरच धबधब्याचा मार्ग लागणार होता ज्याची आतुरतेने वाट बघत होतो..

ही वाट चढताना देखिल हालत आहे याची कल्पना आली.. आमची धमालगाणी सुरु होतीच.. लवकरच पाण्याचा खळखळाट ऐकु आला.. नि धबधब्याचे दर्शन झाले..

पटकन भिजुन घेतले.. आता पुढील मार्ग इथुनच खाली... काहि ठिकाणी तर मला ही वाट म्हणजे हरिश्चंद्रगडाला जाणार्‍या नळीच्या वाटेचे छोटे रुप वाटत होते.. मार्गाक्रमण करताना पाण्याची मजा लुटताना काही घरसरत होते हे सांगणे नकोच..

-------------------------------------

-------------------------------------

-------------------------------------

-----------------------------------

------------------------------------
वाटले शेवटपर्यंत हा मार्ग साथ देईल.. पण जवळपासा खाली उतरलो नि वाट डावीकडच्या जंगलात घुसली.. तिथुनच पाचेक मिनीटात आम्ही मोठ्याश्या पठारावर आलो..

हिरवेगार असे पठार फुटबॉलचे मैदानच भासत होते.. मागे वळुन पाहिले तर चंदेरीचा पुर्ण डोंगर नजरेत भरला.. आमची दिवसभरातील वाटचाल ह्या डोंगरावरच झाली होती.. फिदीफिदी

( डोंगर चंदेरीचा..)
----------------------------------------------

काहीकाळ विश्रांती घेउन आम्ही पुढे वाटचाल केली.. वीस पंचवीस मिनीटे चाललो तरी पठार संपत नाही..

( वाटेतच एका बाजुला दुरवर ही डोंगररांग दिसली.. डोंगररांग कसली सुळक्यांचा कारखाना भासत होता.. विचारले असता मललंगडची रांग आहे असे कळले..)

बाकी या पठारावर थोडीफार आजूबाजुस मोजकी झाडे लागतात तेवढेच.. इकडुनच पुढे वाटेला दोन फाटे फुटले होते.. दोन्हीकडुन गेले असता या वाटा खाली गावातच सोडतात..

आम्ही काही अवधीतच गाव गाठले ! आमच्या स्वागतासाठी गरमागरम पोहे नि चहा सज्ज होते.. तशी लिडरलोकांनी सोय करुन ठेवली होती.. आमचे खाउन झाले तर अर्ध्यापेक्षा जास्ती बरेच मागे होते.. उतरत होते..
आम्हाला घेण्यासाठी रिक्षा येणार होत्या.. तोपर्यंत आम्ही जवळच असलेल्या नदीवर जाउन मस्तपैकी फ्रेश झालो.. दिवसभरात केलेली तंगडतोड नि ओल्या बुटाने केलेला ट्रेक त्यामुळे पाय चांगलेच पांढरेफिके पडले होते.. तिथेच संथ प्रवाहाच्या नदीत सांजकाळी शांतपणे पाय बुडवून ठेवले.. काहिजणांनी इथेपण डुबकी मारलीच..

काही वेळेतच रिक्षा आली नि आम्ही वांगणी स्थानकाकडे कूच केले.. एकूण दिवसभरात धबधब्यांनी लखलखणारी चंदेरी पाहिल्याचे समाधान होते.. ज्यांना हा ट्रेक करायचा आहे त्यांनी वांगणीहुन जाण्याचे बघावे.. आपल्यामध्ये किती दम आहे याची कसोटी घेणारा ट्रेक आहे.. नि हो पादत्राणे चांगली नसतील तर आपटलाच समजा.. फिदीफिदी
चढताना वाटले तरच टो़कापर्यंत जा ! नाहितर धबधब्यापर्यंत जाउन "लख लख चंदेरी" म्हणत मजा करा.. स्मित

4 comments:

Unknown said...

Mastach yogi...Sahi lihila ahe...:)

Smruti Desai said...

ky baat hai yogi....
Just fantastic......

Yogi... Yo Rocks.. !! said...

Thnks mates !! :)

adityap31 said...

YO ROX!!!

Post a Comment