Monday, January 24, 2011

Alang-Madan Trek with Trekmates- 15-16 January 2011मला पहिल्यापासूनच निसर्गाची, गड-दुर्गांची ओढ आहे. त्यांच्या सानिध्यात गेलो कि मी सगळं विसरून जातो, स्वतःला सुद्धा. पायाच्या ऑपरेशन नंतर बरोबर एक वर्षाने पुन्हा दुर्ग भ्रमणाची इच्छा उफाळून वर येऊ लागली. मी लगेचच माहित असलेल्या सर्व ट्रेकिंग ग्रुप न भेटी दिल्या. या आठवड्यात कुठे न कुठे तरी जायचेच हे ठरवून माहिती गोळा करू लागलो. त्याच दिवशी माझा मित्र निलेश पाटील चा मेसेज मला आला. त्याच्याच TrekMates India या ग्रुप तर्फे "अलंग- मदन" ला जायचे ठरले होते. निलेश स्वतःच नेतृत्व ( lead ) करणार असल्याने मी निर्धास्त मनाने नाव नोंदवून टाकले आणि ट्रेक च्या दिवसाची वाट बघू लागलो. आणि.........तो दिवस उजाडला. आवश्यक ते सामान, पाणी बरोबर घेतले. १४/१/२०११ शुक्रवारी रात्री निघालो. शेवटच्या कसारा ट्रेन ने जायचे होते. ४-५ जण आधीपासूनच तेथे उभे होते. त्यांना जॉईन झालो. ट्रेन अगदी वेळेवर आली. ट्रेक ला जाणारे सर्वजण (28 जण) एकाच डब्यात चढलो. १५ जानेवारीला सकाळी ३ वाजता कसारा स्टेशन ला उतरलो. येथून पुढे गाडीने "आंबेवाडी" पर्यंत जायचे होते. ३ गाड्या तयारच होत्या. सामान भरून लगेच निघालो. थंडीचा कडाका आता चांगलाच जाणवायला लागला होता. वाटेत गरम चहा पिऊन आम्ही ४.३० ला आंबेवाडीलाला पोहोचलो. पहिल्याच दृश्याने आमची उत्सुकता वाढली. समोरच कळसुबाई, अलंग, मदन आणि कुलंग गड आमच्या स्वागताला उभे होते.

उतरल्यावर झटपट सगळ्यांशी ओळख करून झाली (Introduction Round). नाश्त्याच्या पिशव्यांचे वाटप झाल्यावर ६.०० वाजता चालायला सुरुवात केली. पूर्वेला तांबडे फुटले होते आणि वाटेवरचे अंधुक अंधुक दिसायला लागले.
गाव संपवून दाट झाडीतल्या पायवाटेने जायला लागलो. हिरव्यागार झाडीतून चालताना वेगळाच आनंद मिळत होता. ९.३० ला आम्ही आमच्या पहिल्या मुक्कामी पोचलो. खिंडी जवळच्या गुहेमध्ये बसून भरपेट नाश्ता केला.
वेळ फुकट न घालवता सामान तेथेच ठेवून पुढे निघालो कारण "मदन गड" आम्हाला खुणावत होता. 
मदनगडा कडे जाणाऱ्या वाटा अरुंद आहेत. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर एके ठिकाणी, एका बाजूला कडा मध्ये दीड-दोन फुट जागा आणि दुसऱ्या बाजूला २००० फुट खोल दरी अश्या अवघड जागी आलो. (Tough traverse on Madangad) प्रत्येक पाउल सांभाळून टाकत सर्वजण पुढे आलो. परत काही अरुंद जिने चढल्यावर ४० फुट उभा कातळ (rock patch-40 feet) समोर आला. गावातला मार्गदर्शक, निलेश आणि त्याचे सहकारी यांनी रोप बांधून ठेवले होते. सूचना पाळून व थोड्या मदतीने हे आयुष्यातले पहिलेच Rock climbing पूर्ण केले. आता मला घाई लागली होती ती गडाचा माथा गाठण्याची.तसं पहिले तर गड खूप छोटा आहे. तासाभरात संपूर्ण गड पाहून होतो. अरुंद पायऱ्या, गुहा, पाण्याच्या टाक्या आणि माथ्यावरून दिसणारे अलंग-कुलंग व डोंगर रांगा हे अप्रतिम दृश्य यामुळे " मदन गड " चांगलाच लक्षात राहिला. दुपारी २ वाजता परत खाली उतरू लागलो. ४ वाजता परत गुहेमध्ये येऊन पोटभर खाऊन घेतले व अलंग कडे निघालो.


अलंग गड :


अलंगचा पहिला २५ फुटाचा Rock patch सर्वांनी सहज पार केला. आता मात्र सर्वांचा कस लागणार होता. ५० फुट उभा कडा आम्हाला आव्हान देत उभा होता( Rock patch 2 - 50 feet ). पुन्हा एकदा रोप लागले. सूर्य मावळला होता. एक एक करून सर्वांना वर ओढून घेण्यात आले. रात्री ८.३० ला मी गडावर पोहोचलो. टिपूर चांदण्यात चालताना खूप मजा येत होती.
अलंग वरची गुहा खूप प्रशस्त आहे. १००-१२५ माणसे तिच्यात सहज राहू शकतात. यातल्याच एका सपाट जागेवर चटई टाकून आराम केला. तासाभरात सारा थकवा कुठच्याकुठे पळाला. गुहेतून बाहेर येऊन गड निरखू लागलो. चांदण्यातही गड पाहताना, केलेल्या श्रमांचे चीज झाल्याची भावना मनाला सुखावत होती. वर अफाट आकाश पसरलं होतं. रात्र संपूच नये असा वाटत होतं. आता वेळ झाली होती जेवणाची. अपूर्व आणि ग्रुप ने झटपट व चविष्ट बिर्याणी बनवली. सगळ्यांनीच त्यावर ताव मारला. भरपेट जेवण आणि जोडीला थंडी यामुळे झोप कधी लागली हे कळले सुद्धा नाही.

सुदैवाने मला पहाटे लवकरच जाग आली. सूर्योदयाला अजून थोडा अवकाश होता. पायवाटा, डोंगर सारेच अंधुक दिसत होते. ४-५ जण माझ्याही आधी उठून वर चढून जाताना दिसले. मी पण लगेचच त्यांच्या मागोमाग गेलो. मला सूर्योदय चुकवायचा नव्हता. हळूहळू अंधाराचा पडदा वर उचलला गेला.रातकिड्यांचा किर्र sssss आवाजही थांबला. भंडारदरा जलाशया वरती सोनेरी छटा आली.                                                                                                   
                          
मी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला. सूर्याने दाट धुक्यातून अलगद मान बाहेर काढली. किती सुंदर दृश्य होते ते ! केवळ अवर्णनीय ! मी मुकेपणाने त्या क्षणाचा आस्वाद घेत होतो. स्मरणात जितके साठवता येईल तितके साठवत होतो.
सूर्य थोडासा वर आल्यावर भंडारदरा जलाशय वितळलेल्या सोन्यासारखा झगमगू लागला.कॅमेरा जवळ नसल्याने हे क्षण केवळ माझ्या आठवणींमध्ये बंदिस्त झाले.

उजेड वाढल्यावर किल्ला पाहायला चालू केले. गडाचा आकार अवाढव्य आहे. C आकाराचा हा किल्ला पाहता क्षणीच ओळखू येतो. गडाच्या वरील भागात एक भग्न सभागृह, पाण्याच्या टाक्या, गुहा, शिलालेख व काही पडझड झालेले अवशेष दिसतात. मदनगडा प्रमाणे या गडाचाही फारसा इतिहास उपलब्ध नाही. संशोधनास मात्र प्रचंड वाव आहे.

   

Trekking च्या निमित्ताने का होईना आपण आपल्या इतिहासातील मौल्यवान ठेव्याकडे बघतोय हेही नसे थोडके.
अविस्मरणीय अनुभव साठवून परत खाली गुहेत आलो. बरेच जण अजून आळस झटकत होते. ताजेतवाने झाल्यावर आयते "maggi noodles" समोर आल्यावर आनंद द्विगुणीतच झाला. पाणी भरायच्या निमित्ताने बाहेर पडून अक्खा गड परत पाहून घेतला, आठवणींमध्ये कायमचा कोरून ठेवला.

दुपारी २ वाजता परतीच्या वाटेवर लागलो. त्याच ५० फुटाच्या Rock Patch वरून दोरीच्या सहाय्याने खाली उतरलो ( Rappelling ). ५.३० ला गावात आमच्या गाईड च्या घरी चहा घेऊन गाडीत जाऊन बसलो. मी त्या टेम्पो च्या बाहेर लटकणेच पसंत केले. टेम्पो ने वेग घेतला तसे तसे गडांपासून दूर जाऊ लागलो. पुन्हा एकदा भेटण्याची मनोमन प्रतिज्ञा करून, एका वळणावर अलंग आणि मदन चा मी निरोप घेतला.

Technical Information :
Base village: Ambewadi District : Nashik
Alang gad: Height- 4500 feet approx.
Madan gad: Height- 4900 feet approx.
Udayraj Sathe, Thane.

3 comments:

सचिन पाटील said...

मस्तच...मागच्या वर्षी कळसूबाई आणि रतनगडचा ट्रेक केला होता...अलंग-मदन-कुलंग ची चढाई करणे हे माझे स्वप्न आहे...आणि ते मी लवकरच पुर्ण करेन.

Trek Mates India said...

Awesomely written Uday...

Vikram Singh said...

Sahi re Uday...
Mast ach lihilay...

Ani Sachin tu fakt karachay boltos...yet ka nahi?

Post a Comment