Wednesday, March 13, 2013

Adventure of Alang - Madan with Amit Railkar

नमस्कार मंडळी... 

ढाकबहिरीच्या यशस्वी ट्रेक नंतर माझा पुढचा ट्रेक होता तो म्हणजे सगळ्यात कठीण पण तरीसुद्धा सर्व गिर्यारोहकांना आकर्षित करणारा आणि प्रत्येक गिर्यारोहकाने आयुष्यात एकदा तरी करावा असा म्हणजे अलंग, मदन आणि कुलंग (एएमके). त्यातला कुलंगचा ट्रेक माझा हयाआधी झाला होता पण अलंग आणि मदन मात्र काही केल्या होता होत नव्हता.. 

निलेश पाटीलने (ट्रेकमेट्सचा सर्वेसर्वा) ह्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अलंग मदनचा ट्रेक आयोजित केला आणि कोणत्याही परिस्थितीत ही संधी हातातून घालवायची नाही असे ठरवून काही झाले तरी मी येणार असे त्याला सांगितले. 

निलेशच्या प्लॅन प्रमाणे ८ मार्च २०१३ रोजी रात्री ठीक अकरा वाजून वीस मिनिटांनी मुंबईहून कसार्‍याला जाणारी लोकल पकडायची होती, पण माझ्याकडे असलेल्या वेळापत्रका प्रमाणे अकरा वाजून वीस मिनिटांनी कोणतीही कसारा लोकल नव्हती. (मी मध्यरेलवेत असल्यामुळे मला योग्य ती माहिती वेळेवर मिळत असते). त्यादिवशी माझी संध्याकाळची शिफ्ट होती पण अचानक मला सकाळच्या शिफ्टला बोलावण्यात आले आणि निलेशने रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईहून सुटणारी कसारा अर्धजलद लोकल पकडायची आहे असे सांगितले. माझे नशीब खूप चांगले होते म्हणून माझी शिफ्ट ऐन वेळेला बदलली नाहीतर मला कामावरूनच ट्रेकला जावे लागले असते, घरी आल्यावर माझ्या बायकोने मला पुदिन्याची खास चटणी त्याबरोबर पाव आणि सॉस पण दिला होता. :) 

लोकल यायच्या दहा मिनिटे अगोदर मी स्टेशनला जाऊन पोहोचलो. (तसे स्टेशन माझ्या घरापासून दोन मिनिटावर आहे ती गोष्ट वेगळी). लोकल आली पण तिला बर्यापैकी गर्दी होती म्हणून मग मी आपला फर्स्ट क्लास मधे जाऊन बसलो. शहाड स्टेशन आल्यावर मग मी निलेश जिथे होता त्या डब्यात आलो, बघतो तर काय फक्त मी सोडून फक्त चारच जण दिसत होते. निलेश, विशाल खोंड, विशाल मोरे आणि अभिजीत. टिटवाळ्याला रोशेल, जेनिवीव (की जेल्विन की जिलेबिन) माहीत नाही, (कारण तिचे नाव मला शेवट पर्यंत कळलेच नाही) आणि रितु सिंग अशा तीन मुलींना निलेश घेऊन आला.. विशालने इतक्यात एक माहिती पुरवली की निलेश हा ट्रेक रद्द करणार होता कारण अलंग आणि मदनवर जो रॉक पॅच आहे तो सहजपणे पार करणारा लाखन नावाचा आंबेवाडी गावातील गिर्यारोहक त्याचा दादर येथे सत्कार असल्यामुळे (उत्कृष्ट गिर्यारोहक) उपलब्ध होऊ शकणार नव्हता आणि त्याच्या ऐवजी दुसर्या कोणावरही निलेशचा विश्वास नव्हता. कारण इथे थोडी सुद्धा चुक करून चालत नाही (नजर हटी दुर्घटना घटी) पण विशालने सांगितले की आधी तिथे जाऊ लाखनला भेटू आणि मग काय करायचे ते ठरवू. मला सुद्धा हा ट्रेक रद्द झालेला चालणार नव्हता कारण माझे स्वप्न आणि मनापासूनची इच्छा होती की काही झाले कितीही त्रास झाला तरी हा ट्रेक पूर्ण करायचाच. 

रात्री ठीक एक वाजून वीस मिनिटांनी लोकल कसार्याला पोहोचली, ह्याच लोकल मधे पुढच्या डब्यात आणखीन चार जण ह्या ट्रेक साठी आले होते. ते आमची वाट पाहत पुढे उभे होते, त्यातल्या एकाला भेटल्यावर निलेश आणि विशाल सोडल्यास आम्हा सगळ्यांना एकदम धक्काच बसला, त्याचे कारणही तसेच होते. कारण त्यांच्यामधे एक ब्रिटीश नागरिक (विदेशी पर्यटक किंवा परदेशी गिर्यारोहक काही म्हणा सगळे सारखेच) होता. त्याचे नाव क्रिस आहे असे कळले (आणि मला रितिक रोशनचा क्रिश पिक्चर आठवला तसाच हा असेल तर  :P ) असो तर सौरभ, कपिल, सौविक आणि क्रिस असे मिळून आम्ही एकूण बाराजण झालो. स्टेशनच्या बाहेर एक जीप आमची वाट बघत होती, एकदम पुढे सौरभ आणि विशाल, मधे कपिल सौविक आणि क्रिस तर पाठीमागे मी, अभिजीत, निलेश आणि त्या तीन मुली असे सगळे बसलो. मला खरच खूप चहा प्यायची खूप इच्छा झाली होती आणि तसे मी निलेशला सांगितले देखील. निलेशने माझे ऐकले आणि बाबा दा ढाबावर चहा पिण्यासाठी गाडी थांबली, कारण इथला चहा खूप फेमस असतो म्हणे (निलेशच्या म्हणण्यानुसार) मी ह्याआधी ही इथे दोन वेळा चहा प्यायला आहे पण मला असे त्यात विशेष काही वाटले नाही. कदाचित ग्रूपचा परिणाम पण असु शकतो. चहा पिऊन झाल्यावर निलेशने त्यांना सांगितले की जर पाणी घ्यायचे असेल (खास करून त्या ब्रिटीश साठी) तर इथेच घ्या कारण पुढे स्वच्छ पाणी मिळणार नाही. 

मजल दरमजल करत गाडी अडीच पावणेतीनच्या सुमारास आंबेवाडीमधे आम्ही येऊन दाखल झालो. तिथे आधीपासूनच लाखन आमची वाट पाहत होता, त्याने निलेशला सांगितले की उद्या तुमच्याबरोबर गावातील दोघेजण मदतीसाठी येणार आहेत. हे ऐकल्यावर आमचा जीव भांड्यात पडला (खासकरून माझा). रात्री साडेतीनच्या सुमारास झोपलो आणि सकाळी सव्वासहा वाजता उठलो, उठल्या उठल्या गरम गरम चहाचा आस्वाद घेऊन शरीर एकदम तरतरित झाले. गावातील दोन गिर्यारोहक तोपर्यंत आम्हाला येऊन भेटले होते. एकाचे नाव होते हिरामण तर दुसर्याचे होते रघुनाथ. साडेसातच्या सुमारास आम्ही ट्रेकला सुरवात केली. अलंग आणि मदनला जायचा रस्ता थोडा फिरून मधला एक डोंगर पार केल्यावर अलंग किल्ल्याच्या बाजूबाजूने जंगलातून जातो, आम्ही पहिल्या डोंगराच्या मध्यावर पोहोचलो नसू की आम्हाला लक्षात आले की आमच्या बरोबर येणारा रघु नावाचा गावकरी अचानक गायब झाला आहे आणि तो कुठे गेला आहे तेच काही केल्या कळत नव्हते. हिरामणने खबर दिली की तो परत घरी गेला आहे, का आणि कशासाठी ते काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे तो परत येई पर्यन्त त्याची वाट बघण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता. निलेश आणि विशाल हे जरी उत्तम गिर्यारोहक असले तरी अलंगचा सुमारे साठ ते सत्तर फुटाचा रॉकपॅच रोपच्या मदतीशिवाय चढून जाणे खूप कठीण गोष्ट होती. निलेशने आधीच कल्पना देऊन ठेवली की जर हा परत आला नाही तर आपल्याला इथूनच परत फिरावे लागेल आणि अलंग मदन ऐवजी कुलंग किल्ला करावा लागेल. बहुतेक जण हे ऐकल्यावर एकदम उदास झाले आणि मनातूनच त्या रघुला शिव्या घालू लागले. हिरामणने परत खबर दिली की त्याचा फोन आला होता की तो येतोय. परत सगळ्यांच्या अंगात उस्ताहाचे वारे वाहू लागले. रघु आला पण तो येईपर्यंत आमचा अर्धा ते पाऊण तास फुकट गेला. मग सगळ्यांनी पटापट पावले टाकायला सुरवात केली. जेनिवीव उर्फ जिलेबी (विशाल मोरेच्या म्हणण्यानुसार तसे सगळेच म्हणत होते पण का ते काही कळले नाही) सगळ्यात आरामशीर येत होती आणि तिच्यामुळे विशाल खोंड आणि आणखीन दोघे जण सुद्धा हळूहळू येत होते. निलेश बराच पुढे गेला होता, मधूनच तो एओ एओ अशा आरोळ्या ठोकत होता. (एओ ही आरोळी एव्हढ्यासाठीच की कोणाचे नाव न घेता मागे राहिलेल्या शेवटच्या लीडरला (बॅक लीडर) कळावे की आपण किती मागे आहोत की हाकेच्या अंतरावर आहोत हेच जाणून घेण्यासाठी). 

मधे एका ठिकाणी थोडेसे पाणी होते तिथे ज्यांच्या ज्यांच्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या होत्या त्यांनी त्या भरून घेतल्या आणि परत पुढे निघालो. पाऊण एक तासाने एक छोटा रॉकपॅच आला ज्याच्या दगडामधे पायर्या खोदून रस्ता करण्यात आला होता. त्याठिकाणाहून अलंगच्या किल्ल्यावर जाणारा सत्तर फुटाचा सरळसोट रॉकपॅच दिसत होता. साधारणपणे बाराच्या सुमारास आम्ही अलंगच्या रॉकपॅचच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो. मधे छोटे छोटे दोन तीन रॉकपॅच होते, दिसायला जरी त्यातल्या त्यात सोपे वाटत असले तरी खरी मजा येणार होती ती उतरताना. अलंगच्या रॉकपॅच जवळ एक बर्यापैकी मोठी किमान दहाजण सहज राहू शकतील अशी गुहा (केव) होती. निलेशने तिथे सगळ्यांना थांबायला सांगितले आणि तिथे आपल्या सॅक ठेऊन जेवण करून मग मदन करून परत इथेच यायचे आणि मग अलंगवर जायचे आहे असे सांगितले. त्याप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या सॅक त्या गुहेत ठेवल्या आणि बरोबर आणलेले ब्रेड, बटर, जॅम मी आणलेली पुदिन्याची चटणी तसेच इतर खायच्या गोष्टींवर यथेच्छ ताव मारला. सकाळपासून काही खाल्ले नसल्यामुळे सगळ्यांना खूप भूक लागली होती. माझ्या बायोकच्या हातच्या केलेल्या चटणीने सगळ्यांची वाहवा मिळविली आणि पुढच्या वेळेला येताना भरपुर चटणी तरी घेऊन ये नाहीतर तुझ्या बायकोला तरी घेऊन ये असा निलेशने मला सल्ला कम आदेश कम डोस दिला. 

साडेबाराच्या सुमारास आम्ही मदनकडे जायला प्रस्थान केले, निलेशने आधीच सांगून ठेवले की जास्ती वेळ वाया घालवू नका कारण आपल्याला अजुन अलंगचा मोठा पॅच करायचा आहे आणि तिथे आपला खूप वेळ जाणार आहे, तेंव्हा जास्तीत जास्त दुपारी चार वाजेपर्यंत आपल्याला परत इथे यायलाचा हवे. अलंगला ट्रॅवर्स मारत (म्हणजे किल्ल्याला वळसा घालून) दोन्ही किल्ल्यांच्या कोल मधे (म्हणजे दोन्ही किल्ल्यांच्या मधल्या दरीत) येऊन पोहोचलो. तिथून मदनवर जाणार्या पायर्या दिसत होत्या. त्या पायर्या अशा काही भयानक ठिकाणी खोदलेल्या होत्या की एका साइडला खोल दरी तर दुसर्या साइडला उंचच उंच कडा पण जाताना इतके काही भीतीदायक वाटले नाही पण खरी मजा तर पुढे होती. मदनला वळसा घालून पुढे जिथे रॉकक्लाइंबिंग करायचे होते तिथे जाताना फक्त दीड फुटाचाच रस्ता होता आणि एके ठिकाणी तो मधेच थोडा तुटला होता, तिथे अगदी कडेला विशाल फक्त चार बोटांवर उभ राहता येईल अशा ठिकाणी उभा होता आणि सगळ्यांना कुठे आणि कसा पाय ठेवायचा कुठे पकडायचे आणि कसे जायचे हे सांगत होता. जोपर्यंत सगळे जात नाहीत तोपर्यंत तो तिथेच उभा होता, खरच शिवाजी महाराजांच्या मर्द मराठ्यांची आठवण तेंव्हा मला झाली. पुढे मदनचा तो तिस फुटाचा रॉकपॅच आला. निलेश रघु आणि हिरामण आधीच वर गेले होते तर खाली विशाल उभा होता. क्लाइंब करण्यासाठी सगळ्यांना तो विशेष असा पट्टा (त्याला काय म्हणतात मला खरेच माहीत नाही) आणि रोप अडकवण्यासाठी लागणारा हूक तो घालत होता. वरुन आणखीन एक रोप खाली सोडण्यात आला होता कारण जिथे कोणाला चढताना जर ग्रिप (एखादी खोबणी ज्यामधे हात घालून वर चढायला मदत होते) नाही मिळाली तर तो त्या रोपला धरून वर चढू शकेल ह्यासाठी. सगळ्यात आधी कपिल मग सौविक त्यमागून क्रिस, सौरभ, जेनिवीव, रोशेल, रितु, विशाल मोर, आणि मग मी माज्या पाठोपाठ अभिजीत आणि विशाल असे सगळे वर चढून गेलो. जे जे आधी वर गेले होते त्याना पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी सांगितले. हा पॅच पार करून गेल्यावरही अजुन बरेच वर चढायचे होते, मदनच्या एकदम शेवटच्या टोकाला जाऊन परत यायला आम्हाला तीन वाजले. 

मदन वर जास्ती फिरण्यासारखे असे काही खास नाही आहे, अलंग आणि कुलंग ह्या दोन किल्ल्यांच्या मधे मदन हा किल्ला आहे. त्याचा उपयोग आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून केला जात असे. समुद्रसपाटी पासून सुमारे चारहजार पाचशे फूट ह्याची उंची आहे. कुलंग नंतर सगळ्यात उंचीचा हा किल्ला आहे. ह्या किल्ल्यावर दोन गुहा (केव) आहेत. एक फारच छोटी आहे तर एक बर्यापैकी मोठी आहे त्यात जवळपास दहा ते पंधरा जण आरामशीर राहू शकतात. इथे पाण्याच्या फक्त दोनच टाक्या आहेत तर एक छोटी टाकी आहे. गिर्यारोहक शक्यतो इथे राहायचे टाळतात कारण बाजूला असलेल्या अलंग आणि कुलंग येथे राहायची चांगली सोय आहे तसेच पाण्याच्याही बर्याच टाक्या आहेत. आम्ही गेलो तेंव्हा मदनवरील दोन्ही मोठ्या टाक्या कोरड्या ठणठणीत होत्या तर छोट्या टाकी मध्ये पण थोडेफार पाणी शिल्लक होते. सध्या बाटल्यांमध्ये मिळणार्या शुद्ध पाण्यापेक्षाही जास्ती शुद्ध आणि तितकेच थंड पाणी ह्या टाकीमधे होते. पाण्याची चव इतकी छान होती की काही केल्या तहान काही भागत नव्हती. बरोबर आणलेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. जिथून आम्ही क्लाइंब करून वर आलो तिथे निलेश आणि हिरामण आमची वाट बघत थांबले होते. मग हळूहळू एकेक जण रॅपलिंग करून सॅक ठेवलेल्या गुहेच्या दिशेने जायला निघाले. माझ्यापुढे सौरभ कपिल आणि सौविक होते. त्यांचे मात्र फोटो सेशन चालू होते आणि पंधरा वीस मिनिटे झाली तरी ते काही संपायला मागत नव्हते. सौविक नंतर क्रिस बरोबर पुढे निघून गेला. मदनच्या त्या (सगळ्यात आधी जिथून आम्ही चढून वर आलो त्या) पायर्यांपाशी पोहोचल्यावर फोटो काढता काढता कपिलचा रेबॅनचा गॉगल खाली पडला आणि गायब झाला आणि त्यांचे फोटो सेशन संपले. (अशाप्रकारे संपेल असे वाटले नव्हते असो  :P ). 

निलेशने ठरवले होते त्याप्रमाणे बरोबर चार वाजता सगळे जण गुहेत (केव) आले, गुहेत येताना सगळ्यांनी आपल्याबरोबर सुकी लाकडे घेऊन आले कारण किल्ल्यावर लाकडे असतीलच असे नाही आणि रात्रीचे जेवण व उद्याचा नाश्ता करायचा असेल तर चूल पेटवावी लागेल आणि त्यासाठी लाकडे गरजेची होती. गुहेपाशी आल्यावर हिरामणने आणखीन एक धक्का दिला. रघुनाथ उर्फ रघु परत एकदा गायब झाला होता.:o  तो कुठे गेला कोणालाच काही माहिती नव्हते. आता झाला का गोंधळ, आता ह्या माणसाला कुठे शोधायचे. हिरामण सहज म्हणून त्या रॉकपॅच पाशी त्याला शोधायला गेला तर हा भाई तिथे गाढ झोपला होता, म्हणजे आज माझे नशीब खरच बलवत्तर होते. 

क्लाइंबिंग पॅचकडे जाण्याआधी कमीतकमी शंभर फूट वर जाण्यासाठी मधे काही पायर्या होत्या पण त्यातल्या शेवटच्या पायर्या पूर्णपणे तूटल्या होत्या, तूटल्या कसल्या उध्वस्त झाल्या होत्या (की केल्या होत्या कोणास माहीत.) निलेश आणि गावातले आधी वर गेले त्यांच्या मागोमाग विशाल मोरे देखील गेला आणि मग तिथे पायर्यांवर लोखंडी अँगल बसवले होते त्यात रोप टाकून मुलींनावर घेतले आणि मग सगळ्यांच्या बॅग्स वरती देण्यात आल्या. तोपर्यंत निलेश हिरामण आणि रघु रॉकपॅच पाशी गेले. रघुने तो रॉकपॅच फ्री क्लाइंब करत (म्हणजे रोपच्या मदतीशिवाय) वर गेला आणि बरोबर नेलेला रोप तिथल्या अँगल मधे अडकवून हिरामणला वर खेचून घेतले. त्यांच्या पाठोपाठ निलेश देखील वर गेला. निलेशने वरती गेल्यावर व्यवस्थित रोप फिक्स करून एक रोप खाली सोडला आणि विशाल कडून पुली मागून घेतली. पुलीचा वापर जास्ती करून तेंव्हाच केला जातो की जिथे अजिबात पकडायला ग्रिप अर्थात जागा नसते. (विहीर बघितली असेल तर पाण्याची बालदी बाहेर काढण्यासाठी ज्याप्रकारे पुलीचा वापर करतात तसाच वापर इथे फक्त क्लाइंबर वर ओढण्यासाठी केला जातो.) निलेशने आणखीन एक रोप खाली सोडला ज्याला त्याने ठराविक अंतरावर गाठी (नॉट्स) बांधल्या होत्या. त्याच्यामुळे क्लाइंब करायला थोडी मदत होते. हे झाले बोलायचे पण जेंव्हा क्लाइंब करायची वेळ येते तेंव्हा काय करावे हेच कळत नाही. सगळ्यात आधी कपिलने क्लाइंब केले. त्याची सुरवात तर व्यवस्थित झाली पण नंतर मात्र त्याला खेचुनच घ्यावे लागले. मग अभिजीतने देखील बर्यापैकी क्लाइंब केले, मग माझी वेळ आली, आणि सुरवातच अडखळत झाली ती शेवट पर्यंत. मला रोपची ग्रिप काही केल्या नीट पकडायला जमत नव्हती आणि त्यामुळे वरच्यांनी खेचल्यावर देवळातली घंटा कशी वाजते तसा मी त्या रॉक वर आपटत होतो. तिथे माझा विश्वास पण गेला आणि अंगातली शक्ति सुद्धा गेली. मला अक्षरशहा त्यांनी खेचून वर घेतले. सगळ्यात मजा तर त्या क्रिसची आली, जणू काही त्याने इथे येऊन कोणतातरी मोठा गुन्हा केला आहे आणि त्यासाठी त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे अशा थाटात त्याला वर खेचून घेतले. त्याला काय म्हणायचे आहे हे कोणी ऐकूनच घेतले नाही. एकेक करून सगळ्यांना वर खेचून घेण्यात आले. मग सगळ्यांच्या बॅग्स खेचून घेण्यात आल्या आणि मग लाकडे पण बांधून वर खेचून घेण्यात आली. रॉकपॅच क्लाइंब झाल्यानंतर पायर्या चढून वर जायचे होते, सगळ्यांना खूप कंटाळा आला होता ( सहाजिकच आहे इतके कठीण पॅच पार केल्यावर अजुन काय होणार). शेवटी एकदाच्या पायर्या चढून अलंग किल्ल्यावर आलो आणि दोन मिनिटे स्वर्गात आल्याचा भास झाला. किल्ल्यावर आलो तरी गुहा अजुन लांब आणि उंचावर होती. गुहेच्या आधी एक पाण्याची बर्यापैकी साफ (क्रिसने सुद्धा ते पाणी प्यायची हिम्मत दाखवली म्हणजे नक्कीच साफ होते) होते, कपिल सौविक आणि क्रिस सोडल्यास बाकी सगळे आम्ही तिथेच थांबलो. मी आधी माझे बूट काढले थंडगार पाणी पोटात टाकले आणि लगेच आडवा झालो. काय सुख वाटत होते म्हणून सांगू  :) . खरच एकदा हा ट्रेक करा आणि हे सुख अनुभवा. 

निलेशने लगेच आपल्या सॅकमधून दोन मोठी पातेली (जेवण बनविण्यासाठी लागणारी भांडी) काढली. तिथे आधीपासूनच कोणीतरी चूल मांडून ठेवली होती त्यामुळे आमचे कष्ट कमी झाले. निलेशने लगेच टॅमाटोचे सूप करायला सुरवात केली. आणि दुसर्या भांड्यात रात्रीच्या जेवणासाठी वेज बिर्यानीसाठी आणलेले तांदूळ भिजावायला घेतले. सुपात मॅगी नुडल्स पण घातले (मॅगी मसाला नाही नाहीतर काहीतरी भलतेच झाले असते). सगळ्यांना खूप भूक लागली होती त्यामुळे सगळ्यांनी सुपावर आडवा हात मारला (म्हणजे पोटभर सूप प्यायले). सूप प्यायल्यावर मला इतकी छान झोप लागली की विचारूच नका. (कारण ऑफीसची गडबड नाही कामाचा ताण नाही घरच्यांची बडबड नाही की पोरीची कटकट नाही मग अशी झोप लागणे स्वाभाविकच होते.) जवळपास तासभर झोप झाल्यावर जेंव्हा मी माझे डोळे उघडले तेंव्हा मी नक्की कुठे आहे हेच मला कळले नाही. टॉर्चच्या प्रकाशात बिर्यानी तयार करणे चालू होते. कधी कधी मुली बरोबर असल्याचा हाही एक फायदा होतो की त्यांच्याकडून जेवणातली थोडीफार कामे करून घेता येतात. बिर्यानी तयार झालीच होती त्यासोबत लिज्जत पापड, ठेचा आणि लोणचे मग काय विचारता. अहाहा असे डिनर तेही इतक्या उंचावर निरभ्र आकाशाखाली चांदण्याच्या प्रकाशात करायला खुपच मजा आली. 

जेवण झाल्यावर आम्ही गुहेच्या दिशेने निघालो. गुहा खुपच मोठी होती आणि त्यात चार ते पाच खोल्या होत्या. मी लगेच माझी स्लीपिंग बॅग काढली आणि जास्ती वेळ न घालवता झोपेच्या आहारी गेलो. सकाळी निलेशने हाक मारली तेंव्हा मला जाग आली. बाकीचे सगळेजण अलंग किल्ला बघायला गेले होते. तर निलेश चुलीच्या ठिकाणी गेला होता आणि सकाळच्या न्याहारीची (ब्रेकफास्ट) तयारी करत होता. मी सुद्धा लगेच सगळे आवरून तिथे गेलो. आज महाशिवरात्र होती त्यामुळे खरतर आज माझा उपास होता, पण घरी जायला खूप उशीर होणार होता आणि त्यामुळे आज उपास नाही करायचा असे मी ठरवले. पाण्याच्या टाकीजवळच एक शंकराचे छोटेसे मंदिर होते. तिथे जाऊन त्याच्या पाया पडून आमचा ट्रेक असाच व्यवस्थित पूर्ण होऊ दे म्हणून मी देवाला विनंती केली. तोपर्यंत एव्हाना सगळेजण किल्ला बघून परत आले होते. अभिजीतने मला विचारले की तू का नाही आलास किल्ला बघायला. मी सांगितले की माझ्यात ताकद नव्हती आणि मला झोप अनावर झाली होती म्हणून मग मी नाही आलो. (मी आणि हा किल्ला कुठेही जाणार नाही आहे आणि जर नशिबात असेल तर परत भेट होईलच) निलेशने केलेल्या पोह्यांवर यथेच्छ ताव मारुन आणि रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून आम्ही पारतीच्या प्रवासाला सुरवात केली तेंव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते. 

पायर्या उतरून आम्ही परत क्लाइंब केलेल्या ठिकाणी येऊन पोहोचलो. हिरामण काल संध्याकाळी घरी परत गेला होता तो परत सकाळी आमची वाट बघत खाली उभा होता. सगळ्यात आधी विशालने रॅपल डाउन केले आणि दुसर्या रोपवरुन बॅग्स खाली पाठवल्या गेल्या. फक्त अर्ध्या तासात सगळ्यांनी रॅप्लिंग केले. मग पायर्यांच्या इथला वीस फुटाचा रॉकपॅच उतरून आम्ही आदल्यादिवशी मदनला जाताना बॅग्स ज्या गुहेत ठेवल्या होत्या तिथे पोहोचलो. मधले छोटे छोटे रॉकपॅच पार करत मजलदर मजल करत दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास आम्ही लाखनच्या घरापाशी येऊन पोहोचलो. त्या गावातील एका घरात आमच्या दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. गावातले बहुतेक जण क्रिसकडे अवाक् होऊन बघत होते कारण त्यांनी आज पर्यंत भरपूर गिर्यारोहक बघितले असतील पण असा फिरंगी पहिल्यांदाच आला होता. ज्या घरात जेवणाची सोय करण्यात आली होती तिथे क्रिस सुद्धा बूट काढून आणि मांडी घालून खाली बसून जेवण करत होता. त्याच्या बाबतीत ही गोष्ट खरोखर अभिनंदन करण्यासारखी होती. 

नंतर आम्हाला कासार्या पर्यंत सोडण्यासाठी एक जीप ठरवण्यात आली. सुरवातीला क्रिस, कपिल आणि सौरभ जीपच्या टपावर बसून प्रवासाचा आनंद घेत होते, जसा हाइवे जवळ आला तसे ते मागे आमच्यात येऊन बसले. कसारा येईपर्यंत आम्ही गाणी गात होतो. सातच्या सुमारास आम्ही कसार्याला येऊन पोहोचलो. आठ वाजून पंधरा मिनिटांची लोकल होती. आमच्याकडे बराच वेळ होता. सव्वा सातच्या सुमारास कसारा लोकल आली. आम्ही त्यात जागा पकडून बसलो. क्रिस तर लोकल मधे बसल्या बसल्या पार झोपून गेला. मग निलेश, रोशेल, विशाल खोंड, विशाल मोरे, आणि जेनिवीव पत्ते खेळण्यात मग्न झाले तर अभिजीत एका बाजूला खिडकी मधे जाऊन झोपला. इथे तीन पत्तीचा खेळ रंगात आला होता, दोन्ही विशाल आणि जेनिवीव ह्यांनी गेम मधून काढता पाय घेतला तर रोशेल आणि निलेश ह्यांच्यात शेवट पर्यंत डाव रंगला. नंतर नंतर तर निलेशने फसवून रोशेलला हरवायचा प्रयत्न केला आणि त्याला मी साथ दिली. पण शेवटचा डाव रोशेलने जिंकला आणि तिथेच आमचा ट्रेकसुद्धा संपला. आता राहिल्या आहेत त्या फक्त आणि फक्त आठवणी. मी माझ्या आयुष्यात कधी हा ट्रेक करेन की नाही ह्याची मला शंका आली होती पण केवळ माझ्यातल्या जिद्दीने, निलेशच्या मदतीने आणि इतरांच्या सहकार्याने हा ट्रेक यशस्वी झाला आणि माझे गेल्या साडेतीन वर्षापासूनचे एक स्वप्न पूर्ण झाले. 

जर हे वृतांत लिहिताना कोणाला दुखावले असेल तर त्यासाठी मला माफ करा. पण मी असेच लिहीत राहणार कोणाला काहीही का वाटेना. धन्यवाद. 













आपला  अमित राईलकर.

Wednesday, March 6, 2013

Trek to Dhak Bhairi with TMI... - Amit Railkar


जवळपास साडेतीन वर्षानंतर मी ट्रेक करायचे ठरवले आणि म्हणून मी ट्रेक मेट्स बरोबर ढाकबहिरी ह्या ट्रेकला जाण्याचे पक्के केले.. 



मला हा ट्रेक करायचाच होता पण आधी जमले नाही आणि नंतर वेळ मिळाला नाही.. ठरल्याप्रमाणे दिनांक २ मार्च २०१३ ला रात्री ठीक ०९ वाजून ०३ मिनिटांनी ठाणे रेलवे स्टेशन वरुन कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली.. अनिकेत ठोसर (ट्रेक मेट्सचा ह्या ट्रेकचा लीडर) ह्याने देखील हीच गाडी ठाण्यावरुन पकडली.. पण आमची भेट झाली ती कर्जत स्टेशनला. सुमारे रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी गाडी लोणावळा स्टेशनला पोहोचली.. तिथे आधीपासूनच विशाल खोंड आमची वाट बघत होता... त्याच्या बरोबर आणखीनही काही ट्रेकर्स होते. आम्ही सगळे मिळून जवळपास बावीस जण होतो.. तिथून मग आम्ही सगळे लोणावळा बस स्टॅंडला गेलो. तिथे आधीपासूनच ठरवल्या प्रमाणे दोन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.. एका गाडी मधे बारा जण तर दुसर्या गाडी मधे दहा जण बसवले.. बसवले कुठले अक्षरशहा घुसवले म्हणलात तरी चालले.. मी ज्या गाडीत होतो त्या गाडीत सहा मुली (म्हणजे विचारूच नका नुसता चिवचिवाट  :P ) आणि सहा मुले (त्यातले अर्धे झोपलेले आणि उरलेले एकमेकांच डोक खात होते.. मधल्या सीटवर मी ऋषिकेश, शिवा आणि आणखीन एक जण होता, आमची मधल्या सीटवर मारामारी चालू होती. विशाल खोंडने सांगितले की फक्त अर्ध्यातसाचाच प्रश्न आहे तर तुम्ही जरा सांभाळून घ्या आमच्या सॅक दुसर्या गाडीच्या टपावर बांधण्यात आल्या होत्या.. आम्हाला ढाक किल्ल्याच्या जवळ असलेल्या जांभवली गावात जायचे होते... 


कामशेतवरुन तिथे जायला फाटा फुटतो, कामशेत पर्यंत हाइवे असल्यामुळे तोपर्यंत काही जाणवले नाही पण जसे कामशेत सोडले आणि छोट्या रस्त्याला लागलो तेंव्हा खरी धमाल सुरू झाली.. आधीच खराब रस्ता आणि त्यात ड्राइवरच्या अतिविश्वासामुळे त्याने चुकुन चुकीच्या ठिकाणी चुकीच्या रस्त्यावर गाडी घेतल्यामुळे (काय करणार रात्रीची वेळ होती त्यामुळे होते असे कधी कधी) आम्ही रस्ता चुकलो आणि चुकुन शिरोटा डॅमकडे जाणार्या रस्त्याला लागलो. जाताना डॅमचे पहिले फाटक लागले आणि तिथे कोणी नसल्यामुळे ते आम्हालाच उघडावे लागले आणि ते काम आम्ही आमच्या पुढच्या गाडीत असलेल्यांकडे सोपवले. फाटक दिसल्यावर मनात जरा शंकेची पाल चुकचूकली पण सांगणार कोणाला कारण सगळेच नवीन (म्हणजे आमच्या गाडीतले जागे असलेले) शेवटी जेंव्हा दुसर्या फाटकापाशी आलो तेंव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी सांगितले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात तेंव्हा सगळा गोंधळ लक्षात आला. (जर हाच सुरक्षारक्षक आधीच्या फाटकापाशी असता तर आमचा वेळ, आमची मेहेनत आणि गाडीचे इंधन ह्याची बचत झाली असती), असो मग परत आमचा जांभवलीचा प्रवास सुरू झाला.. सरते शेवटी सुमारे दीड ते दोन तास प्रवास केल्यानंतर एकदाचे जांभवली गाव आले.. (अजुन जर अर्धातास उशीर झाला असता तर बहुतेक मी वेडावाकडा होऊनच बाहेर पडलो असतो  ;) ) 

परत एकदा असो.. विशालने सांगितले की इथला नेहमीचा गाइड भूमिगत झाला आहे (म्हणजे फोन बंद करून ढाराढूर झोपला आहे) मग काय आता नवीन गाइडची शोधाशोध सुरू झाली तीही रात्री दीड वाजता, (रात्र कुठली मध्यरात्र सुद्धा उलटून गेली होती.) इतक्यात समोरच्या घरातून एक वयस्कर गृहस्थ बाहेर आले आणि आम्हाला जणूकाही देवच भेटल्याचा अनुभव आला. मग त्याना सोबत येण्यासाठी मनवणे चालू झाले, हो नाही करता करता शेवटी ते एकदाचे तयार झाले.. त्यांच वय बघता ते तयार झाले हेच आमच्यासाठी खूप होत... मग समोरच्या देवळात रात्री पावणे दोन ते दोन च्या सुमारास सगळ्यांची ओळख परेड झाली आणि आल्यापासून आम्हाला कोणी साथ दिली असेल तर गावच्या कुत्र्यांनी.. (आता मला सांगा डोळ्यावर प्रचंड झोप आणि तिथल्या कुत्र्यांचे भुंकणे आणि त्यातून काळोख कस काय लक्षात राहणार नक्की कोणाचे नाव काय आहे ते). मग आम्ही सगळे त्यांच्या मागोमाग निघालो... 


सुमारे एक तासभर चालल्यानंतर (चालणे कमी आणि चढउतार जास्ती) आम्ही एका पठारावर पोहोचलो... सगळ्यांनी तिथेच झोपायची तयारी सुरू केली.. पण इथे नाही आणखीन पुढे जायचे आहे असे सांगून विशालने सगळ्यांना उठवले परत एकदा सगळे जण कंटाळून (दमले होते म्हणून वैतागून) उठले आणि परत आमचा प्रवास सुरू झाला. वाटेत मधेच जंगल आडवे आले (की आम्ही जंगलाला आडवे आलो) आणि तिथून जंगलातून आणि खाच खाळग्यातुन उतरायला सुरवात झाली आणि मग माझ्या लक्षात आले की आपण काही तरी महत्वाचे विसरलो आहोत, कारण माझ्याजवळ टॉर्च नव्हता :o आणि रात्रीचा ट्रेक करताना तो अगदी महत्वाचा असतो.. मग काय पडत धडपडत मोबाइलच्या प्रकाशात जंगलाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागी सुमारे पहाटे साडेतीनच्या सुमारास पोहोचलो.. विशालने सगळ्यांना सांगितले की पहाटे सहा वाजता उठून आपल्याला ट्रेक पूर्ण करायचा आहे.. खुपच चालणे झाल्यामुळे पाय पण दुखत होते आणि घामाने अंग पण ओले झाले होते. मी माझी स्लीपिंग बॅग काढली आणि त्यावर तसाच झोपून गेलो.. पण फक्त तासभरच झोपु शकलो असेन की थंडीने हालत खराब झाली. मग मुकाटपणे स्लीपिंग बॅगच्या आत जाऊन झोपलो..


सकाळी (पहाटे) ठीक साडेसहा वाजता विशालने सगळ्यांना उठवायला सुरवात केली.. सात सव्वासातच्या सुमारास सगळे निघालो, आणि ढाक किल्ला आणि आणि त्याच्या बाजूला असलेल्या सुळक्याच्या मधोमध असलेल्या चिमणीमधे पोहोचलो. तिथे वारा ज्याप्रमाणात वाहत होता की काय करायचे कसे उतरायचे कोणालाच कळत नव्हते... एकेक करत सगळ्यांनी हळूहळू उतरायला सुरवात केली, खाली उतरल्यावर जेंव्हा ढाक बहिरीच्या गुफेकडे जाण्याचा रस्ता बघितला आणि पोटात गोळाच आला, पण ट्रेक तर पूर्ण करायचा होता, मग मनाचा हिय्या केला आणि मधे असलेल्या छोट्या गुहेच्या इथे जाऊन थांबलो.. तिथे सगळ्यांनी आपापल्या सॅक ठेवल्या आणि मुख्य बहिरी गुहेच्या दिशेने प्रस्थान केले. विशालने आधी वारा खूप असल्यामुळे पुढे जाणे धोक्याचे आहे असे सांगितले. मग विशाल आणि अनिकेत पुढे जाऊन पहाणी करून आले आणि सगळ्यांना पटापट निघायच्या सूचना देण्यात आल्या, सरळसोट उभाच्या उभा कडा आणि तिथे एक स्टील रॉडचे रोलिंग लावले होते आणि दगडात पायर्‍या खोदलेल्या होत्या. तो पॅच पार केल्यावर पुढे तशाच पायर्‍या मात्र तब्बल शंभर ते दीडशे फुटचा उभा कडा चढायचा होता, चढताना काही वाटले नाही पण खरी हालत होणार होती ते उतरताना, पण विशाल अनिकेत तसेच इतर निष्णात ट्रेकर्समुळे आणि त्यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे कठीण वाट सुद्धा खूप सोपी झाली :). 


साडेआठ वाजता सगळे बहीरीच्या गुहेत गेलो तिथे दर्शन घेतले आणि देवदर्शन कधीच सोपे नसते हे तेंव्हा लक्षात आले.. परत एक अर्ध्यातासात उतरायला सुरवात केली आणि जिथे आम्ही सॅक ठेवल्या होत्या तिथे परत आलो. नंतर सगळ्यांनी आपापल्या आणलेल्या खाण्यावर यथेच्छ ताव मारला आणि परतीच्या मार्गाला लागलो कारण उन जर वाढले तर नंतर त्याचा आम्हालाच त्रास होणार होता. सुमारे दीडच्या सुमारास आम्ही गावात परत आलो तिथून लोणावळा मग तिथून खोपोली आणि तिथून लोकलने संध्याकाळी साडेसात वाजता घरी आलो. 

अतिशय उत्तम असा आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा असलेला ट्रेक एकदाचा पार पडला... माझे हे ट्रेकचे वर्णन केवळ मजा मस्ती आणि फक्त करमणूक व्हावी ह्यासाठी केले आहे ह्यात कोणालाही दुखवण्याचा उद्देश मुळीच नव्हता, जर कोणास काही चुकीचे आढळले तर त्यानी तसे मला सांगावे ही विनंती.. 

 - आपला अमित राईलकर...