जवळपास साडेतीन वर्षानंतर मी ट्रेक करायचे ठरवले आणि म्हणून मी ट्रेक मेट्स बरोबर ढाकबहिरी ह्या ट्रेकला जाण्याचे पक्के केले..
मला हा ट्रेक करायचाच होता पण आधी जमले नाही आणि नंतर वेळ मिळाला नाही.. ठरल्याप्रमाणे दिनांक २ मार्च २०१३ ला रात्री ठीक ०९ वाजून ०३ मिनिटांनी ठाणे रेलवे स्टेशन वरुन कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली.. अनिकेत ठोसर (ट्रेक मेट्सचा ह्या ट्रेकचा लीडर) ह्याने देखील हीच गाडी ठाण्यावरुन पकडली.. पण आमची भेट झाली ती कर्जत स्टेशनला. सुमारे रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी गाडी लोणावळा स्टेशनला पोहोचली.. तिथे आधीपासूनच विशाल खोंड आमची वाट बघत होता... त्याच्या बरोबर आणखीनही काही ट्रेकर्स होते. आम्ही सगळे मिळून जवळपास बावीस जण होतो.. तिथून मग आम्ही सगळे लोणावळा बस स्टॅंडला गेलो. तिथे आधीपासूनच ठरवल्या प्रमाणे दोन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.. एका गाडी मधे बारा जण तर दुसर्या गाडी मधे दहा जण बसवले.. बसवले कुठले अक्षरशहा घुसवले म्हणलात तरी चालले.. मी ज्या गाडीत होतो त्या गाडीत सहा मुली (म्हणजे विचारूच नका नुसता चिवचिवाट :P ) आणि सहा मुले (त्यातले अर्धे झोपलेले आणि उरलेले एकमेकांच डोक खात होते.. मधल्या सीटवर मी ऋषिकेश, शिवा आणि आणखीन एक जण होता, आमची मधल्या सीटवर मारामारी चालू होती. विशाल खोंडने सांगितले की फक्त अर्ध्यातसाचाच प्रश्न आहे तर तुम्ही जरा सांभाळून घ्या आमच्या सॅक दुसर्या गाडीच्या टपावर बांधण्यात आल्या होत्या.. आम्हाला ढाक किल्ल्याच्या जवळ असलेल्या जांभवली गावात जायचे होते...
कामशेतवरुन तिथे जायला फाटा फुटतो, कामशेत पर्यंत हाइवे असल्यामुळे तोपर्यंत काही जाणवले नाही पण जसे कामशेत सोडले आणि छोट्या रस्त्याला लागलो तेंव्हा खरी धमाल सुरू झाली.. आधीच खराब रस्ता आणि त्यात ड्राइवरच्या अतिविश्वासामुळे त्याने चुकुन चुकीच्या ठिकाणी चुकीच्या रस्त्यावर गाडी घेतल्यामुळे (काय करणार रात्रीची वेळ होती त्यामुळे होते असे कधी कधी) आम्ही रस्ता चुकलो आणि चुकुन शिरोटा डॅमकडे जाणार्या रस्त्याला लागलो. जाताना डॅमचे पहिले फाटक लागले आणि तिथे कोणी नसल्यामुळे ते आम्हालाच उघडावे लागले आणि ते काम आम्ही आमच्या पुढच्या गाडीत असलेल्यांकडे सोपवले. फाटक दिसल्यावर मनात जरा शंकेची पाल चुकचूकली पण सांगणार कोणाला कारण सगळेच नवीन (म्हणजे आमच्या गाडीतले जागे असलेले) शेवटी जेंव्हा दुसर्या फाटकापाशी आलो तेंव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी सांगितले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात तेंव्हा सगळा गोंधळ लक्षात आला. (जर हाच सुरक्षारक्षक आधीच्या फाटकापाशी असता तर आमचा वेळ, आमची मेहेनत आणि गाडीचे इंधन ह्याची बचत झाली असती), असो मग परत आमचा जांभवलीचा प्रवास सुरू झाला.. सरते शेवटी सुमारे दीड ते दोन तास प्रवास केल्यानंतर एकदाचे जांभवली गाव आले.. (अजुन जर अर्धातास उशीर झाला असता तर बहुतेक मी वेडावाकडा होऊनच बाहेर पडलो असतो ;) )
परत एकदा असो.. विशालने सांगितले की इथला नेहमीचा गाइड भूमिगत झाला आहे (म्हणजे फोन बंद करून ढाराढूर झोपला आहे) मग काय आता नवीन गाइडची शोधाशोध सुरू झाली तीही रात्री दीड वाजता, (रात्र कुठली मध्यरात्र सुद्धा उलटून गेली होती.) इतक्यात समोरच्या घरातून एक वयस्कर गृहस्थ बाहेर आले आणि आम्हाला जणूकाही देवच भेटल्याचा अनुभव आला. मग त्याना सोबत येण्यासाठी मनवणे चालू झाले, हो नाही करता करता शेवटी ते एकदाचे तयार झाले.. त्यांच वय बघता ते तयार झाले हेच आमच्यासाठी खूप होत... मग समोरच्या देवळात रात्री पावणे दोन ते दोन च्या सुमारास सगळ्यांची ओळख परेड झाली आणि आल्यापासून आम्हाला कोणी साथ दिली असेल तर गावच्या कुत्र्यांनी.. (आता मला सांगा डोळ्यावर प्रचंड झोप आणि तिथल्या कुत्र्यांचे भुंकणे आणि त्यातून काळोख कस काय लक्षात राहणार नक्की कोणाचे नाव काय आहे ते). मग आम्ही सगळे त्यांच्या मागोमाग निघालो...
सुमारे एक तासभर चालल्यानंतर (चालणे कमी आणि चढउतार जास्ती) आम्ही एका पठारावर पोहोचलो... सगळ्यांनी तिथेच झोपायची तयारी सुरू केली.. पण इथे नाही आणखीन पुढे जायचे आहे असे सांगून विशालने सगळ्यांना उठवले परत एकदा सगळे जण कंटाळून (दमले होते म्हणून वैतागून) उठले आणि परत आमचा प्रवास सुरू झाला. वाटेत मधेच जंगल आडवे आले (की आम्ही जंगलाला आडवे आलो) आणि तिथून जंगलातून आणि खाच खाळग्यातुन उतरायला सुरवात झाली आणि मग माझ्या लक्षात आले की आपण काही तरी महत्वाचे विसरलो आहोत, कारण माझ्याजवळ टॉर्च नव्हता :o आणि रात्रीचा ट्रेक करताना तो अगदी महत्वाचा असतो.. मग काय पडत धडपडत मोबाइलच्या प्रकाशात जंगलाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागी सुमारे पहाटे साडेतीनच्या सुमारास पोहोचलो.. विशालने सगळ्यांना सांगितले की पहाटे सहा वाजता उठून आपल्याला ट्रेक पूर्ण करायचा आहे.. खुपच चालणे झाल्यामुळे पाय पण दुखत होते आणि घामाने अंग पण ओले झाले होते. मी माझी स्लीपिंग बॅग काढली आणि त्यावर तसाच झोपून गेलो.. पण फक्त तासभरच झोपु शकलो असेन की थंडीने हालत खराब झाली. मग मुकाटपणे स्लीपिंग बॅगच्या आत जाऊन झोपलो..
सकाळी (पहाटे) ठीक साडेसहा वाजता विशालने सगळ्यांना उठवायला सुरवात केली.. सात सव्वासातच्या सुमारास सगळे निघालो, आणि ढाक किल्ला आणि आणि त्याच्या बाजूला असलेल्या सुळक्याच्या मधोमध असलेल्या चिमणीमधे पोहोचलो. तिथे वारा ज्याप्रमाणात वाहत होता की काय करायचे कसे उतरायचे कोणालाच कळत नव्हते... एकेक करत सगळ्यांनी हळूहळू उतरायला सुरवात केली, खाली उतरल्यावर जेंव्हा ढाक बहिरीच्या गुफेकडे जाण्याचा रस्ता बघितला आणि पोटात गोळाच आला, पण ट्रेक तर पूर्ण करायचा होता, मग मनाचा हिय्या केला आणि मधे असलेल्या छोट्या गुहेच्या इथे जाऊन थांबलो.. तिथे सगळ्यांनी आपापल्या सॅक ठेवल्या आणि मुख्य बहिरी गुहेच्या दिशेने प्रस्थान केले. विशालने आधी वारा खूप असल्यामुळे पुढे जाणे धोक्याचे आहे असे सांगितले. मग विशाल आणि अनिकेत पुढे जाऊन पहाणी करून आले आणि सगळ्यांना पटापट निघायच्या सूचना देण्यात आल्या, सरळसोट उभाच्या उभा कडा आणि तिथे एक स्टील रॉडचे रोलिंग लावले होते आणि दगडात पायर्या खोदलेल्या होत्या. तो पॅच पार केल्यावर पुढे तशाच पायर्या मात्र तब्बल शंभर ते दीडशे फुटचा उभा कडा चढायचा होता, चढताना काही वाटले नाही पण खरी हालत होणार होती ते उतरताना, पण विशाल अनिकेत तसेच इतर निष्णात ट्रेकर्समुळे आणि त्यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे कठीण वाट सुद्धा खूप सोपी झाली :).
साडेआठ वाजता सगळे बहीरीच्या गुहेत गेलो तिथे दर्शन घेतले आणि देवदर्शन कधीच सोपे नसते हे तेंव्हा लक्षात आले.. परत एक अर्ध्यातासात उतरायला सुरवात केली आणि जिथे आम्ही सॅक ठेवल्या होत्या तिथे परत आलो. नंतर सगळ्यांनी आपापल्या आणलेल्या खाण्यावर यथेच्छ ताव मारला आणि परतीच्या मार्गाला लागलो कारण उन जर वाढले तर नंतर त्याचा आम्हालाच त्रास होणार होता. सुमारे दीडच्या सुमारास आम्ही गावात परत आलो तिथून लोणावळा मग तिथून खोपोली आणि तिथून लोकलने संध्याकाळी साडेसात वाजता घरी आलो.
अतिशय उत्तम असा आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा असलेला ट्रेक एकदाचा पार पडला... माझे हे ट्रेकचे वर्णन केवळ मजा मस्ती आणि फक्त करमणूक व्हावी ह्यासाठी केले आहे ह्यात कोणालाही दुखवण्याचा उद्देश मुळीच नव्हता, जर कोणास काही चुकीचे आढळले तर त्यानी तसे मला सांगावे ही विनंती..
No comments:
Post a Comment